गावखडीत ऑलिव्ह रिडले ची १४०० अंडी संरक्षित
rat२०p२०.jpg-
18979
रत्नागिरी ः तालुक्यातील गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षी महिनाभरात १३ घरट्यांत ऑलिव्ह रिडले या कासवाची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.
गावखडीत ऑलिव्ह रिडलेची १४०० अंडी संरक्षित
विणीचा हंगाम लांबला; महिनाभरात १३ घरटी, कासवमित्रांसह कांदळवन विभागाची देखरेख
सुधीर विश्वासराव ः सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २० ः परतीच्या पावसाने लांबवलेली ओढ आणि बदलत्या हवामानामुळे यंदा गावखडी (ता. रत्नागिरी) समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. असे असले तरीही, कासवमित्रांच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत १३ घरट्यांतून सुमारे १४०० अंडी यशस्वीरित्या संरक्षित करण्यात आली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून गावखडी कासव संवर्धन केंद्राकडे पाहिले जाते. दरवर्षी या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कासवे अंडी घालण्यासाठी येतात. यावर्षी हंगाम उशिरा सुरू झाल्याने पिल्लांना समुद्राकडे झेप घेण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. इतर किनाऱ्यांच्या तुलनेत गावखडीचा किनारा कासवांसाठी अधिक सुरक्षित मानला जातो. येथील प्राणीमित्र आणि कासवमित्र घरट्यांची विशेष काळजी घेतात त्यामुळेच कासवे हमखास या ठिकाणी मार्गक्रमण करतात. या संवर्धन कार्याची भुरळ पर्यटकांनाही पडत असून, दरवर्षी शेकडो पर्यटक या केंद्राला आवर्जून भेट देतात. कासव संवर्धन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी वनविभागाच्या माध्यमातून या परिसरात विशेष गस्त घातली जात आहे. कासवमित्रांना येणाऱ्या अडचणी आणि घरट्यांचे संरक्षण याकडे वनविभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. कासव संवर्धनात विकास आंबेरकर, विनोद सुर्वे, प्रदीप डिंगणकर या स्थानिकांचे मोलाचे सहकार्य असते.
दरम्यान, अभ्यासकांच्या अंदाजानुसार कासवांच्या विणीचा कालावधी पुढे जात आहे. पूर्वी नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात कासवं कोकण किनारी अंडी घालण्यासाठी येत होती; परंतु गेल्या काही वर्षात फेब्रुवारीत कासवं अंडी घालण्यासाठी येऊ लागली आहेत. त्यामुळे कासवांची पिल्ले बाहेर येण्यासाठी पावसाळ्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. कांदळवन कक्षाकडून ऑलिव्ह रिडले कासवाचा अभ्यास सुरू आहे. त्यामधुन गुहागर किनाऱ्यावर यापूर्वी अंडी घातलेले कासव पुन्हा दाखल झाल्याची नोंद कांदळवन कक्षाकडे झाली आहे.
कोट
आमच्या कार्यक्षेत्रात कांदळवन लागवड आणि संरक्षणाची जबाबदारी महत्त्वाची आहेच; मात्र त्यासोबतच या परिसरातील कासव संवर्धन केंद्राकडेही आम्ही विशेष लक्ष पुरवत आहोत. संवर्धनाबाबत वेळोवेळी कासवमित्रांशी विचारविनिमय करून अडीअडचणी सोडवण्यावर आमचा भर आहे.
- अमोल बिराडे, कांदळवन क्षेत्रप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

