संक्षिप्त-देवगडात ७ फेब्रुवारीला खुली कथाकथन स्पर्धा
देवगडात ७ फेब्रुवारीला
खुली कथाकथन स्पर्धा
देवगड, ता. २० ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय खुली कथाकथन स्पर्धा ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता ग्रंथालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नसून महाविद्यालयीन तसेच खुल्या गटातील स्पर्धक स्पर्धेत भाहभागी होऊ शकतात. स्पर्धकाने आपली कथा १० मिनिटांमध्ये कोणत्याही साहित्याचा आधार न घेता सादर करावयाची आहे. कथेचा विषय आणि सादरीकरण यावर गुणदान केले जाईल. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे, १ हजार १११, ७७७, ५५५ रुपये तसेच सर्वांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. परीक्षकांच्या निर्णयानुसार उत्तेजनार्थांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येईल. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धकांनी आपली नावे ३१ जानेवारीपर्यंत ग्रंथपाल प्रशांत बांदकर यांच्याकडे नोंदवावीत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष गुरुदेव परुळेकर यांनी केले आहे.
..................
सिंधुदुर्गातील शेतकरी
अभ्यासदौऱ्यावर रवाना
सिंधुदुर्गनगरी, ता. २० ः महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोप, इस्त्राईल, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारीला या तिन्ही देशांच्या एकत्रित अभ्यासदौऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे. या दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी, १ कृषी विभागाचा अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनीचा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दौरा निघताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.

