‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’
19225
सिंधुदुर्गनगरी : येथे आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित सीईओ रवींद्र खेबुडकर व इतर.
‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’
जिल्ह्यात ‘कुसुम’, ‘स्पर्श’ अभियान; कुष्ठरोग शून्यावर आणण्याचे प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’, या टॅगलाइन अंतर्गत जिल्ह्यात ‘स्पर्श’ आणि ‘कुसुम’ मोहीम ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जात आहे. यावेळी समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, त्याविषयी भेदभाव व कलंक नाहीसा करणे, जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.
श्री. खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘कुसुम’ व ‘स्पर्श’ अभियानाबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. सतीश गुजलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, ग्रामपंचायत विभाग प्रतिनिधी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी नीलेश मठकर, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सोमवारी (ता. २६) आयोजित ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाविषयी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत कुष्ठरोगाबाबत विविध जनजागृती कार्यक्रम राबवायचे आहेत. राज्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार याच कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम राबवायची आहे. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२५-२६ अंतर्गत कुष्ठरोगाबाबत समाजात पसरलेला गैरसमज, अंधश्रद्धा व भीती दूर करण्यासाठी काम करायचे आहे. ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या संदेशाचे वाचन, तसेच सरपंचाचे भाषण व प्रतिज्ञा यांचे वाचन करावे, असे आवाहन खेबुडकर यांनी केले.
अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपातळीवर शिक्षक, विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर व गाव स्तरावर प्रभात फेरी, महिला मेळावे, गटसभा, शालेय मुलांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, सुमारे १५६८ शाळांमध्ये १६१३ आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. अतिजोखमीच्या किंवा संवेदनशील भागातील वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर, स्थलांतरित मजूर, निवास, आश्रमशाळा, विश्रामगृह, खाण कामगार, कारागृहातील कैदी, औद्योगिक कामगार अशा लोकांचे सर्वेक्षण ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘कुसुम’अंतर्गत केले जाणार आहे, असे सांगितले.
....................
सांसर्गिक रुग्णांसाठी बहुविध औषधोपचार
जिल्ह्यात एकूण ६०८ अतिसंवेदनशील भागांमधील सुमारे १२ हजार ५०० नागरिकांची आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि ‘कुसुम’ अभियानांतर्गत नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...................
19259
कुष्ठरोगाची लक्षणे
शरीरावरील कोणताही लालसर फिकट, खाजवणारा चट्टा असणे, तेलकट, गुळगुळीत, चकाकणारी त्वचा तसेच कानाच्या पाळीवर व शरीरावर गाठी येणे, हातांच्या बोटांमध्ये व पायाच्या पंजामध्ये अशक्तपणा व कमजोरी येणे, ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

