राजापूर ः राजापुरात शासकीय कार्यालयांचे शहराबाहेर स्थलांतर
rat21p11.jpg
19205
राजापूरः पंचायत समिती कार्यालयाची इमारत.
राजापुरात शासकीय कार्यालयांचे शहराबाहेर स्थलांतर
सर्वसामान्यांची होतेय आर्थिक परवड; एकाच छताखाली कार्यालये आणणार का?
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः राजापूर तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या राजापूर शहरातून महत्त्वाची शासकीय कार्यालये आता शहराबाहेर जाऊ लागली आहेत. सर्व कार्यालये एकाच छताखाली असावीत, ही जनतेची अनेक वर्षांची मागणी धुळीला मिळाली असतानाच आता असलेली कार्यालयेही शहराच्या सीमेवर स्थलांतरित होत असल्याने सर्वसामान्यांना नाहक आर्थिक भूर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून ते थेट समुद्रकिनारपट्टीपर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण राजापूर शहर हे आहे. या ठिकाणी प्रमुख शासकीय कार्यालये, बाजारपेठेसह अन्य कार्यालयेही आहेत. शासकीय कामासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांना सुमारे ३० ते ४० किलोमीटरचे अंतर कापून शहरात यावे लागते. अनेक गावांना जोडणारी एसटी सुविधा यासह खासगी वाहने प्रवासासाठी उपलब्ध होत असल्यामुळे तालुकावासियांना शहरामंध्ये ये-जा करणे सोयीचे ठरते; मात्र, गेल्या काही वर्षापासून शहरातील शासकीय कार्यालये आता शहराबाहेर जाऊ लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
सर्वसामान्यांच्या व्यावहारिक जीवनाशी निगडित असलेले महावितरण कार्यालय पूर्वी शहरातील जवाहरचौक परिसरात होते. त्यामुळे महावितरण विभागाशी संबंधित कामे, लाईटबिल कमी करणे, विजेसंबंधी तक्रारी अशा कामांकरिता हे कार्यालय सोयीचे ठरत होते; मात्र, सद्यःस्थितीत महावितरणचे कार्यालय कोदवली येथे हलविण्यात आले असून, जवाहर चौकापासून हे अंतर सुमारे दोन ते अडीच किलोमीटर आहे. या ठिकाणी जाण्याकरिता ग्राहकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गेली काही वर्षे महावितरणचे कार्यालय शहरात आणावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसत आहे. शेतकऱ्यांशी निगडित असलेले तालुका कृषी कार्यालयही शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर गेले आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी कार्यालय कोठे आहे हे देखील माहिती नसल्याची स्थिती आहे. तालुक्याच्या प्रशासकीय विभागाचे प्रमुख असलेल्या प्रांताधिकारी कार्यालयही शहराच्या सीमेवर आहे. राजापूर नगरपालिकेच्या साईनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या इमारतीत भाड्याच्या खोलीत प्रांताधिकारी कार्यालय सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी वनविभागाचे कार्यालयही शहराच्या टोकावर म्हणजे रानतळे येथे स्थलांतरित झाले आहे.
चौकट
सर्वसामान्यांना आर्थिक भूर्दंड
ग्रामीण भागाशी निगडित असलेली कार्यालये एकाच छताखाली आणणारा पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्तावही धूळखात पडलेला आहे. आता शासकीय कार्यालये संपर्काच्यादृष्टीने सोयीच्या असणाऱ्या शहरातून बाहेर जाऊ लागली आहेत. त्याचा सर्वसान्यांना फटका बसत असून, शहराबाहेरील कार्यालयांमध्ये जा-ये करण्यासाठी सर्वसामान्यांना अव्वाच्यासव्वा भाडे देऊन खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
कोट
विखुरलेली असली तरी राजापूर शहरामध्ये असलेली शासकीय कार्यालये संपर्काच्यादृष्टीने आणि जा-ये करण्यासाठी सोयीची ठरत होती. मात्र, प्रांताधिकारी कार्यालय, महावितरण, तालुका कृषी कार्यालय, वनविभाग अशी कार्यालये शहराच्या बाहेर आहेत. त्या ठिकाणी जायचे झाले तर नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यापासून होणार्या त्रासापासून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- राकेश जोशी, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

