‘कोकिसरे’त बिनविरोधची शक्यता

‘कोकिसरे’त बिनविरोधची शक्यता

Published on

19328
वैभववाडी ः येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेवारांनी गर्दी केली होती.


‘कोकिसरे’त बिनविरोधची शक्यता

वैभववाडी तालुका; जिल्हा परिषदेसाठी १५; पंचायत समितीसाठी २५ अर्ज

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ ः जोरदार शक्तीप्रदर्शन करीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्रे दाखल केली. जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी १५ तर पंचायत समितीच्या सहा जागांसाठी २५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्याच दोन उमेदवारांव्यतिरिक्त अन्य कुणीही नामनिर्देशनपत्र दाखल न केल्याने या प्रभागाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजचा अंतिम दिवस होता. येथील पंचायत समितीच्या दालनात उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येत होते. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी विनायक पाटील यांनी पूर्ण यंत्रणा सकाळपासून तयारीत ठेवली होती. एकूण सहा टेबल सभागृहात लावली होती. अकरा वाजल्यापासून इच्छुक उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करीत पंचायत समिती कार्यालय परिसरात दाखल होऊ लागले. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्यामुळे कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. काही उमेदवार ढोल-ताशांच्या गजरात अर्ज भरण्यासाठी आले होते. दुपारी अडीच वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आवाहन केले. ज्यांना नामनिर्देशनपत्र दाखल करायची आहे, त्यांनी तीन वाजण्यापूर्वी सभागृहात दाखल व्हावे, त्यानंतर कुणालाही सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व उमेदवारांची सभागृहात गर्दी झाली होती. त्यानंतर सायंकाळी चार वाजेपर्यत सर्व प्रकिया सुरू होती.
जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेनेकडून सुनील नारकर, भाजपकडून प्रमोद रावराणे (४ उमेदवारी अर्ज) दाखल केले. याशिवाय अनंत फोंडके, अतुल सरवटे, राजेंद्र राणे (सर्व भाजप), जितेंद्र तळेकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाकडून श्रावणी रावराणे, नमिता दळवी यांनी तर ठाकरे शिवसेनेकडून शुभांगी सरवणकर नामनिर्देशनपत्र दाखल केले. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाकडून सिध्द सुतार, अनुज्ञा आंगवलकर तर ठाकरे शिवसेनेकडून दिव्या पाचकुडे यांनी नामनिर्देशन दाखल केले. कोळपे पंचायत समितीत भाजपकडून देवानंद पालांडे, ठाकरे शिवसेनेकडून वसंत मोरे, जितेंद्र तळेकर, काँग्रेसकडून रूपेश गुरव तर वासुदेव कामतेकर (अपक्ष २ अर्ज), अमोल मोरे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन दाखल केले.
कोळपे पंचायत समितीत भाजपाकडून सुर्वणा संसारे तर ठाकरे शिवसेनेकडून रिहाना काझी यांनी अर्ज दाखल केले. उंबर्डे पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेकडून स्मिता पाटील, भाजपकडून सांची कोलते तर मैत्री दळवी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. कोकिसरे पंचायत समितीत भाजपकडून साधना नकाशे तर भाजपच्याच अक्षता डाफळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. खांबाळे पंचायत समिती मतदारसंघात भाजपकडून मंगेश लोके, ठाकरे शिवसेनेकडून स्वप्निल रावराणे तर काँग्रेसकडून सिद्धार्थ कांबळे यांनी नामनिर्देशन दाखल केले. लोरे पंचायत समितीत भाजपकडून सिध्देश रावराणे, वासुदेव रावराणे, ठाकरे शिवसेनेकडून लक्ष्मण रावराणे, मनसेकडून अक्षय बागवे तर संतोष बोडके आणि ओंकार रावराणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी सभापती सुवर्णा संसारे दुसऱ्यांदा आणि माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके हे तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहे. ठाकरे शिवसेनेने श्रीमती पाचकुडे यांना लोरे जिल्हा परिषदेतून पुन्हा संधी दिली आहे. भाजपने प्रमोद रावराणे यांना कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून संधी दिली आहे तर देवानंद पालांडे, सिध्देश रावराणे, सिध्दी सुतार, साधना नकाशे, सांची कोलते या नव्या चेहऱ्यांनाही भाजपने संधी दिली आहे. राजकीय पक्षांकडून प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांना संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे.
कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या साधना नकाशे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भाजपच्या माजी सभापती अक्षता डाफळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अन्य कोणत्याही पक्षांच्या किंवा अपक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
-------------
नाराजीचा सुर
जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे काही पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजीचा सुर आहे. अनेकांनी आजच्या प्रकियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते.
------------
पंचायत समितीसाठी दाखल अर्ज
*मतदारसंघ*अर्ज
*भुईबावडा*७
कोळपे*२
उंबर्डे*३
कोकिसरे*२
खांबाळे*३
लोरे*८
एकूण*२५
--------------
जिल्हा परिषदेसाठी दाखल अर्ज
*मतदारसंघ*अर्ज
कोळपे*९
कोकिसरे*३
लोरे*३
एकूण*१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com