१६१ पैकी १२ जणांचे अर्ज अवैध
19479
उमेदवारांचे १६१ पैकी १२ जणांचे अर्ज अवैध
सावंतवाडी तालुका ः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तालुक्यातून दाखल एकूण १६१ पैकी बारा जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ५९ पैकी पाच तर पंचायत समितीच्या १०२ पैकी सात अर्ज अवैध ठरले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी (ता.२७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमकी किती जण आपले अर्ज मागे घेतात, यावरून निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या आणि लढत स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक सावंतवाडीमधून १६१ जणांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज बुधवारी ( ता. २१ ) दाखल केले होते. आज त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी घारे व तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सूचकाची सही, आवश्यक कागदपत्रे तसेच एकाच पक्षाचे दोन उमेदवार अशा त्रुटी काढत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील एकूण बारा जणांचे अर्ज अवैध ठरले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी कोलगावमधून नामदेव नाईक यांनी ठाकरे शिवसेनेकडून भरलेला अर्ज तर प्रमोद सावंत यांनी अपक्ष भरलेला अर्ज अवैध ठरला.
तळवडेमधून विनोद काजरेकर यांनी ठाकरे शिवसेनेकडून भरलेला अर्ज अवैध ठरला. माजगावमधून ठाकरे शिवसेनेचे भगवान गावडे तर इन्सुलीमधून चंद्रकांत कोठावळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरला. पंचायत समिती कलंबिस्तसाठी शिंदे शिवसेनेकडून चंद्रकांत राणे यांनी भरलेला अर्ज अवैध ठरला. मळगावमधून विक्रम पांगम यांचा अपक्ष तर भाजपकडून समीर नेमळेकर यांचा अर्ज अवैध ठरला. माजगावमधून ठाकरे शिवसेनेचे भगवान गावडे यांचा तर भरत गावकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरला. चराठामधून शिल्पा म्हापसेकर यांचा ठाकरे शिवसेनेकडून भरलेला अर्ज अवैध ठरला तर तांबोळीमधून गायत्री सावंत यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विचार करता एकाच उमेदवाराकडून दोन उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते, अशा उमेदवारांचा एकच अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यामुळे पंचायत समितीसाठी ८१ तर जिल्हा परिषदेसाठी ४३ असे एकूण १२४ उमेदवार अर्ज वैध ठरले.
चौकट
पाच ठिकाणी मोठ्या लढती
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवार (ता.२७) शेवटचा दिवस आहे. त्यानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहणार आणि कोणाची लढत कोणासोबत होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी माजगाव, कोलगाव, तळवडे, आंबोली व मळेवाड मतदारसंघामध्ये मोठी लढत पाहायला मिळणार आहे.
चौकट
नाराजी दूर करण्याचे आव्हान
पंचायत समितीसाठी इच्छुकांची नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली बंडखोरी याचा फटका बहुतेक जणांना बसण्याची शक्यता आहे. जागा वाटपामध्ये अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळेही नाराजी निर्माण झाली असून ती क्षमविण्याची कसोटी नेत्यांसमोर उभी ठाकली आहे. परंतु, बहुतेक अपक्ष उमेदवार हे निवडणूक लढवण्यावरच ठाम असल्याने मत विभागणीचा फटका भाजपासोबतच शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना बसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

