कणकवलीत ९१ अर्ज वैध, ३ अवैध

कणकवलीत ९१ अर्ज वैध, ३ अवैध

Published on

कणकवली तालुक्यात ९१ अर्ज वैध, ३ अवैध
छाननी प्रक्रिया ः बीडवाडीतून संजना राणे बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज छाननी प्रक्रिया आज येथील तहसील कार्यालयात पार पडली. यात तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले, तर ३ उमेदवारांनी प्रत्‍येकी दोन अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज वैध ठरले होते. त्‍यातील एक अर्ज रद्द करण्यात आला. आता एकूण ९१ उमेदवारांचे ९१ अर्ज छाननीअंती वैध ठरले आहेत.
कणकवली तालुक्‍यातून जिल्‍हा परिषदेवर ८ सदस्य निवडून जातात. त्‍यासाठी ३५ जण रिंगणात आहेत. पंचायत समिती १६ सदस्यांची आहे. त्‍यासाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवार (ता. २७) हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्‍यामुळे २७ ला सायंकाळी निवडणुकीचे चित्र स्पष्‍ट होईल. दरम्यान, कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघातून वैदही गुडेकर, कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून नीरज मोरये तसेच नांदगाव पंचायत समिती मतदारसंघातून प्राची मोरये यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने त्यातील एक अर्ज आपोआप रद्द करण्यात आला.

चौकट
तीन अपत्ये असल्याने आक्षेप
बीडवाडी पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या संजना राणे आणि ठाकरे शिवसेनेच्या विद्या शिंदे रिंगणात होत्या. यात संजना राणे यांनी त्‍यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विद्या शिंदे यांना तीन अपत्‍ये असल्‍याने त्‍यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी केली. त्‍यासाठी तीन अपत्‍यांची जन्मनोंद, आधारकार्ड आदी पुरावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे सादर केले. त्‍याची खातरजमा केल्‍यानंतर शिंदे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.

चौकट
शपथपत्र नसल्‍याने अर्ज अवैध
जानवली पंचायत समिती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिता चव्हाण यांनी उमेदवारी अर्जासोबत आवश्‍यक असलेले शपथपत्र सादर केलेले नाही, असा आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घेतला. कागदपत्रे तपासून हा आक्षेप मान्य करण्यात आला आणि चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.

चौकट
मतदार नसल्‍याने अर्ज अवैध
लोरे नं.१ पंचायत समिती मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सिद्धिशा राणे कणकवली पंचायत समितीच्या मतदार नाहीत, तर त्‍या कुडाळ पंचायत समितीच्या मतदार असल्‍याने त्‍यांचा अर्ज बाद करण्याची मागणी त्‍यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केली होती. त्याबाबतच्या पुराव्यांची पूर्ततताही करण्यात आली. त्‍यामुळे राणे यांचाही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला.

चौकट
नाटळमध्ये उत्तम लोके यांचा आक्षेप
नाटळ जिल्‍हा परिषद मतदारसंघातील ठाकरे सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांनी त्‍यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. सावंत यांनी आपल्‍या हमीपत्रात त्‍यांच्या मालकीच्या अनेक प्रॉपर्टीचा उल्‍लेख केलेला नाही, असे लोके यांचे म्‍हणणे होते; मात्र सुनावणीअंती त्यांचा आक्षेप फेटाळण्यात आला. त्‍यानंतर विरोधात सुरुवातीला जिल्‍हाधिकारी आणि त्‍यानंतर न्यायालयात दाद मागणार असल्‍याचे लोके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com