भोगाळेतील पाणथळ जागेत भराव धोकादायक
-rat२२p१४.jpg-
P26O19495
चिपळूण : शहरातील भोगाळे येथे पाणथळ जागेत भर टाकून जागा उंच केली जात आहे.
-------------
पाणथळ जागेतील भराव धोकादायक
भोगाळे परिसरात इमारतींची कामे; पासाळ्यात शिवनदीतील पाणी रस्त्यावर येण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः शहरातील भोगाळे परिसरात खोल आणि पाणथळ जागेत वाशिष्ठी नदीचा गाळ टाकून भराव केला जात आहे. हे धोकादायक असून, पावसाळ्यात शिवनदीचे पाणी पात्र सोडून भोगाळे येथील रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
चिपळूण शहरात २०२१ मध्ये महापूर आला. वाशिष्ठी नदीतील गाळामुळे पूर आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नदीतील गाळ काढण्याचे वार्षिक काम सुरू झाले ते यावर्षीही सुरू आहे. नदीतील गाळ काढून तो शहरातील पाणथळ भागात टाकला जात आहे. खोल जागेत भराव करून त्या जागा उंच केल्या जात आहेत. शहरातील अनेक व्यावसायिकांनी नदीतील गाळ आपल्या जागेत टाकण्यासाठी महसूल विभागाकडे मागणी केली आहे. शहराच्या पुराला जेवढी वाशिष्ठी नदी जबाबदार आहे तेवढीच शिवनदीसुद्धा जबाबदार आहे. शिवनदी जेव्हा पात्र सोडते तेव्हा नदीच्या दोन्ही भागात पाणी पसरते. जसा पाऊस कमी होतो तसे पाणीपात्रात परत जाते. भोगाळे भागात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. त्यामुळे नागरी वस्तीवर शहरात भरणाऱ्या पाण्याचा फार परिणाम दिसत नव्हता. शहरात पाणी भरले तर चिंचनाका ते बुरूमतळी भागाकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा असायचा; मात्र सध्या भोंगाळे परिसर हळूहळू दोन्ही बाजूंनी भराव टाकून उचलला जात आहे. शहरातील भोंगाळे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने टाकला जात आहे. त्यातून रस्त्याची उंची वाढवली जात आहे. त्याचे गंभीर परिणाम पावसाळ्यात दिसण्याची शक्यता आहे. चिपळूण पालिका ते खेंड बायपासपर्यंत सर्व घरे-निवासी सोसायट्या यांनी २०२१ ची परिस्थिती अनुभवली आहे. शहरातील खोल भागात भराव केले गेले तर पावसात शिवनदीच्या पात्रातील पाणी रस्त्यावर येण्याचा धोका आहे. भोंगाळे परिसरात सध्या नवीन बांधकाम केले जात आहे. खोल जागेत भराव टाकून त्या उंच करून तेथे अपार्टमेंट बांधल्या जात आहेत. सध्या या भागात सात ते आठ इमारती उभ्या आहेत. भराव टाकून नव्या इमारती झाल्या तर शिवनदीच्या पाण्याला जाण्यासाठी मार्ग मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
----
कोट
शिवनदी पाग सोन्या मारुती मंदिर ते खाटीक आळी सोन्या मारुती मंदिरापर्यंत दोन्ही बाजू नदीपात्राच्या तळापासून पृष्ठभागाच्या वर किमान सहा फूट उंच संरक्षित भिंती बांधणे शक्य आहे. शिवनदीच्या दोन्ही भागास ग्रीनबेल्ट आहे. कोणतेही बांधकाम होऊ शकत नाही. पालिकेने जागामालकांना योग्य मोबदला देऊन जागा ताब्यात घेऊन त्या जागेवर वृक्ष लागवड करावी.
- उदय ओतारी, ग्रामस्थ, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

