ठोस निर्णय घ्या; अन्यथा उपोषण

ठोस निर्णय घ्या; अन्यथा उपोषण

Published on

19573

ठोस निर्णय घ्या; अन्यथा उपोषण

कृती समिती ः उपजिल्हा रुग्णालयप्रश्नी इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उद्या (ता.२४) पर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यासच उपोषणाचा फेरविचार केला जाईल, अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाईलाजाने उपोषणास बसावे लागेल, असा इशारा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने दिला आहे.
कृती समितीच्या शिष्टमंडळाशी काल (ता.२२) सायंकाळी रुग्णालय प्रशासनाने चर्चा केली. वैद्यकीय अधीक्षक रजेवर असल्याने प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीषकुमार चौगुले यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधला. उपजिल्हा रुग्णालयात कागदोपत्री ३४ डॉक्टर असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक पदे रिक्त असल्याचा आरोप करण्यात आला. अभिनव फाउंडेशनच्या जनहित याचिकेनंतर कोल्हापूर सर्किट बेंचने गठीत केलेल्या समितीने पाहणी करून अहवाल सादर केला होता. मात्र, तीन ते चार महिने उलटूनही त्या अहवालावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे कृती समितीने नमूद केले. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी पाहणीदरम्यान वरच्या मजल्यावरील भंगाराने भरलेली खोली रिकामी करून तेथे २० रुग्णांचा वॉर्ड सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, त्या सूचनांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचेही चर्चेत स्पष्ट झाले. २०१३ पासून जनहित याचिका प्रलंबित असूनही शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आला. रक्तपेढीसाठी आकृतिबंधानुसार पदे मंजूर नसल्याने सेवा अडचणीत येत असल्याचे कृती समितीने सांगितले. यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व उपसंचालक डॉ. माने यांची भेट घेण्यात आली असून काही तोंडी आश्वासने मिळाली आहेत. मात्र, त्याबाबत लेखी उत्तर देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दूरध्वनीवरून डॉ. चौगुले यांच्यामार्फत शिष्टमंडळाशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत वरच्या मजल्यावरील वॉर्ड सुरू करणे व काही तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. उद्यापर्यंत लेखी पत्र मिळाल्यासच उपोषणाचा फेरविचार केला जाईल, अन्यथा २६ ला उप जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण अटळ आहे, असा इशारा कृती समितीने दिला.
------------
प्रमुख मागण्या
शिष्टमंडळाने चर्चेवेळी एम.डी. फिजिशियनची नियुक्ती, दोन भुलतज्ञांची कायमस्वरूपी भरती, रक्तपेढीची साठवण क्षमता ४०० रक्तपिशव्यांपर्यंत वाढवणे, ट्रॉमा केअर युनिट कार्यान्वित करणे, रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील लिफ्ट सुरू करणे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना मंजूर वेतन देणे अशा प्रमुख मागण्या मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com