दातांची कीड गेली 10 हजार वर्षे कायम
rat23p4.jpg-
19567
संगीता खरात
----------
पाक-पोषण................लोगो
इंट्रो
खरेतर, पृथ्वीवरील सजीवांमध्ये मानवाला अन्न किंवा पोषण मिळवण्यासाठी सर्वात जास्त वैविध्य आणि पर्याय उपलब्ध आहेत. वनस्पती, प्राणी-पक्षी-मासे यांच्यामधील जैवविविधतेचे प्रतिबिंब मानवाच्या आहारातही पडलेले दिसून येते. मानवाच्या आहाराचा आणि पोषणाचा इतिहास बघितला तर पाषाणयुगातील मानवही आहार आणि पोषण याबाबत जागरूक असल्याचे पुरावे सापडले आहेत.
- संगीता खरात, देवरूख
सहसंचालिका, सृष्टीज्ञान संस्था
-----------------------------------
दातांची कीड गेली १० हजार वर्षे कायम
पोषण ही सजीवांच्या शरीरात घडणारी जैवरासायनिक प्रक्रिया आहे. सजीव यासाठी मुख्यत: अन्नाचा वापर करतात. या शारीरिक प्रक्रियांमध्ये अन्नग्रहण, अन्नाचे पचन-शोषण आणि अखेरिस उत्सर्जन यांचा समावेश आहे. वनस्पतींसारखे सजीव त्यांना आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय अन्नाचे स्वत:च उत्पादन करतात तर इतर सजीव वनस्पतींनी तयार केलेल्या या सेंद्रिय अन्नाचा वापर करून त्यांच्या शरीराचे पोषण करतात. पोषण सजीवांना जिवंत राहण्यासाठी, वाढीसाठी आणि पुनरूत्पादनासाठी आवश्यक असते. मानवांसह सर्व सजीवांना प्रामुख्याने कर्बोदके, फायबर किंवा चोथा, चरबी, प्रथिने आणि पाणी (Macronutrients) या मुख्य पोषक घटकांची गरज असते. त्याचबरोबर खनिजे आणि जीवनसत्त्वे (Micronutrients) यासारख्या सूक्ष्म पोषक घटकांचीही गरज असते. चांगल्या आरोग्यासाठी अन्नातून ही सर्व आवश्यक पोषणमुल्ये मिळणे खूप आवश्यक आहे. या पोषक घटकांअभावी अनेक आजार होऊ शकतात जसे की, लोह खनिजाअभावी अशक्तपणा, अ जीवनसत्त्व कमतरतेमुळे डोळ्यांचे आजार, आहारात चोथा नसल्याने होणारे पचनाचे विकार इ. अथवा या पोषणमुल्यांच्या अभावी असलेले कुपोषण हे विविध आजारांना आमंत्रण देणारे महाद्वार ठरते.
पुरातत्त्व शास्त्रात मानवाचे विविध कालावधीतील जे सांगाडे मिळाले आहेत त्यानुसार मानवाच्या आहारासंबंधी काही निष्कर्ष काढता येतात. सदासर्वकाळ ही पोषक तत्त्वे मानवाला मिळत होती का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे; मात्र ते मिळवण्यासाठी तो पर्यावरणातील विविध घटक वापरत होता, हे मात्र नक्की! आफ्रिकेमधील ओलडूवाय गॉज या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये दोन लाख सहा हजार वर्षांपूर्वीची हाडांमधील अस्थिमज्जा काढून खायची हत्यारे मिळाली आहेत. निसर्गात चरबी आणि साखर सहज वापरता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही. तेव्हा जसजसा मानव उत्क्रांत होत गेला तेव्हा तो मुख्यत: ही चरबी आणि साखर कशी मिळवता येईल, याची तजवीज करू लागला. त्यामधूनच शेतीसारख्या हवे ते अन्न मिळवण्याच्या व्यवस्था त्याने स्वीकारल्या. ११ हजार वर्षांपूर्वी मानवाच्या आहारात खूप वैविध्य होते. उत्तम शिकार करून मिळवलेले मांसाचे विविध प्रकार, भाज्या, कर्बोदके, फळे, तेलबिया यांचा त्यात समावेश होता. त्या काळापर्यंत मानवाचे आरोग्य उत्तम होते, असे सिद्ध झाले आहे. कारण, त्या वेळी मानव ताजे, स्थानिक आणि ऋतुमानानुसार उपलब्ध अन्न खात होता जे प्रामुख्याने प्रथिने केंद्रित होते. त्या काळातील मानवाच्या सांगड्यांमध्ये ४ टक्के दातांमध्ये कीड आढळली आहे. पुढे शेती करायला लागल्यावर धान्ये पिकवणे, ती साठवणे आणि वर्षभर वापरणे या प्रक्रियेत मानवाचा आहार कर्बोदक केंद्रित व्हायला सुरवात झाली. शेतीच्या प्राथमिक अवस्थेमधील मानवांच्या सांगाड्यांमध्ये १४ टक्के दातांची कीड दिसून आली आहे. कारण, कर्बोदक केंद्रित आहारात साखरेचे प्रमाण जास्त असते. ही धान्ये भरडायची किंवा त्यांचे पीठ करायची व्यवस्थादेखील प्रगत नसल्यामुळे दातांना काम अर्थातच जास्त होते. त्यामुळे झिजलेले दात हे पुढच्या काळात मिळालेल्या सांगाड्यांचे वैशिष्ट्य होते. जे पुढे कास्य व लोहयुगात कमी झाले; पण दातांची कीड ही समस्या मानवासाठी गेली दहा हजार वर्षे झाली तरी कायम आहे हे नक्की!
(लेखिका भारतीय पारंपरिक आहार संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

