मोहोर भरपूर, पण ‘हापूस’ दूर

मोहोर भरपूर, पण ‘हापूस’ दूर

Published on

19651

मोहोर भरपूर; पण ‘हापूस’ दूर
वाढती थंडी हंगामाला मारक; पहिल्या टप्प्यातील आंबा अडचणीत

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः बदलत्या हवामानामुळे यंदा हापूस आंबा हंगाम लांबण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. वाढती थंडी आंबा हंगामाला मारक ठरण्याची सद्यस्थिती आहे. सुरूवातीला आलेल्या मोहोरातून अपेक्षित फलधारणा झाली नाही. आलेल्या मोहोरामध्ये नरफुलांची संख्या अधिक असल्याने मुबलक मोहोर येऊनही बागायतदारांच्या पदरी निराशाच आली. त्यातूनही आशेने फवारणी करून आलेली कणी टिकवण्यासाठी प्रयत्न होत असतानाच पुन्हा किनारी भागात थंडीचा जोर वाढल्याने आलेली बारीक कणी गळून पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्‍प्यातील आंबा हंगाम अडचणीत सापडण्याची चिन्हे असून बागायतदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
अलीकडील काही वर्षे बदलत्या वातावरणाचा आंबा हंगामाला फटका बसताना दिसत आहे. निसर्गाची अपेक्षित साथ नसल्यास हंगामामध्ये अनंत अडचणी येतात. मागील हंगाम संपल्यानंतर आंबा बागायतदार पुढील हंगामाच्या अनुषंगाने आशेवर असतात. त्यासाठी पावसाळ्यात आवश्यक मशागत केली जाते. झाडांना खते, संजीवके दिली जातात. झाडांच्या पालनपोषणाकडे आवर्जुन लक्ष दिले जाते. विशेषतः प्रयोगशील मोठे बागायतदार बागांची आवश्यक काळजी घेताना दिसतात. त्यामुळे निसर्गालाही आपल्या साथीला घेण्यासाठी बागायतदारांचे आवश्यक प्रयत्न असतात. निसर्गाचा अभ्यास करून बागांची मशागत करण्यावर भर असतो. मागील वर्षी पावसाळा वेळीच सुरू झाला आणि धो-धो पाऊसही झाला. त्यामुळे मशागतीची कामे वेळीच झाली. परंतु परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला. समुद्रातील वातावरण खराब झाल्याने वादळ सदृश्य स्थिती निर्माण होऊन दिवाळीतही परतीचा पाऊस झाला. मात्र, यथावकाश किनारी भागात अचानक थंडीचा जोर वाढला आणि आंबा हंगामाच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण झाले. थंडी पडण्यास सुरुवात झाली आणि आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या. निसर्गाच्या साथीने आंबा कलमे मोहोरली. झाडांना अपेक्षेपेक्षा अधिक मोहोर आला. त्यामुळे बागायतदारांचे फवारणीचे नियोजन सुरू झाले. आलेला मोहोर टिकवून त्यातून चांगली फलधारणा होण्याच्या दृष्टीने बागायतदारांची धांदल वाढली. मात्र, आलेल्या मोहोरामध्ये नरफुलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसू लागल्याने बागायतदारांचा सुरूवातीचा असलेला उत्साह नंतर काहीसा मावळला. आलेल्या मोहोरावर फारशी कणीच नसल्याचे समोर आल्याने बागायतदारांची काहीशी निराशा झाली. तरीही काही प्रमाणात आलेली कणी टिकवून त्याची जोपासना करण्यासाठी बागायतदारांचे फवारणी सत्र सुरूच होते. मात्र, गेले काही दिवस किनारी भागात पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने आंबा कलमांवर खार पडण्यास सुरूवात झाली आहे. आलेला मोहोर काळवंडला आहे. त्यातून बऱ्यापैकी झाडावर कणी दिसत असताना पुन्हा वाढत्या थंडीमुळे कणी गळून पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांच्या चेहऱ्यावरील चिंता गडद झाली आहे.
....................
19654
खर्च अधिक; उत्पन्न मर्यादित
हापूस आंबा कलमांना आलेल्या मोहोरामध्ये नरफुलांचे प्रमाण अधिक असल्याने अपेक्षित फलधारणा झालेली नाही. त्यातच वाढत्या थंडीमुळे आलेली कणी गळून पडण्याच्या मार्गावर आहे. बागायतदारांचे कणी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पहिल्या टप्यात आलेल्या मोहोरामधून मुबलक आंबा येईल, अशी सद्यस्थिती नाही. पर्यायाने यंदा सुरूवातीच्या आब्यांचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या उत्पादनात घट होणार असल्याने खर्च अधिक आणि उत्पन्न मर्यादित असे चित्र राहण्याची शक्यता बागायतदार वर्तवत आहेत.
.................
19655
श्रीकांत नाईकधुरे

यंदा आंबा हंगामाची स्थिती खडतर आहे. आलेल्या मोहोरावर फारशी कणी नसल्याने उत्पादन घटणार आहे. त्यातच अतिथंडीमुळे झाडावरील असलेली कणी पिवळी पडून गळत आहे. कणी गळण्यास सुरूवात झाली आहे. आलेले पीक वाचवण्यासाठी फवारणी सुरूच आहे. मात्र यंदा सुरूवातीचे आंबा उत्पादन जेमतेम वीस टक्केच येईल असे चित्र आहे. आलेला बहुतांशी मोहोर वांझ निघाल्याने मोहोरातून अपेक्षित फलधारणा झाली नाही. यंदा हंगाम लांबण्याची शक्यताही दिसू लागली आहे. त्यामुळे यंदाच्या आंबा हंगामाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत आहे.
- श्रीकांत नाईकधुरे, प्रगतिशील आंबा बागायतदार, बापर्डे (देवगड)
.................................
19656
अजय मुंज
यंदा हवामान बदलामुळे आंबा हंगामाची स्थिती बागायतदारांच्या दृष्टिने समाधानकारक दिसत नाही. सुरूवातीच्या टप्‍प्यात आलेल्या मोहोरामध्ये नरफुलांची संख्या अधिक राहिली. त्यामुळे अपेक्षित फलधारणा झाली नाही. नवीन मोहोर येण्यासही काहीसा विलंब झाला. त्यामुळे येणारे उत्पादनही त्या प्रमाणात पुढे लांबणार आहे. तसेच हवामान बदलामुळे फळगळ सुरू झाली आहे. पर्यायाने अपेक्षित फलधारणा होण्यावर मर्यादा येतील. उत्पादन लांबणीवर जाऊन अपेक्षित दर मिळेल याची खात्री बागायतदारांना वाटत नाही.
- डॉ. अजय मुंज, कीटकशास्त्रज्ञ, आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्‍वर (देवगड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com