असे वागाल तर व्हाल सजग पालक

असे वागाल तर व्हाल सजग पालक

Published on

rat25p9.jpg-
19955
डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे

- राखूया मनाचे आरोग्य .........लोगो

इंट्रो

पालकत्व ही जगातील सर्वात जबाबदारीची आणि आनंदाची भूमिका मानली जाते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, ती केवळ मुलांना जन्म देणे आणि त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करणे एवढ्यापुरती मर्यादित नाही. प्रत्येक पालकाला वाटते की आपण आपल्या पाल्याला सर्वोत्तम सुविधा, शिक्षण आणि संस्कार द्यावेत. मात्र, नकळतपणे अनेक पालक ''अजाण पालकत्व'' (Unintentional or Unconscious Parenting) कडे वळतात. कसे ते समजून घेऊ.

- डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे, रत्नागिरी
एमबीबीएस, डी.पी.एम., एमआयपीएस

--------


असे वागाल तर व्हाल सजग पालक


आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात ''अजाण पालकत्व'' ही एक गंभीर समस्या आहे. मात्र ती दुर्लक्षित आहे. अजाण पालकत्व म्हणजे, जिथे पालक आपल्या वागण्या-बोलण्याचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतोय, याचा विचार न करता केवळ परंपरेने किंवा समाजाच्या दबावाखाली येऊन मुलांशी वागतात.
अनेकदा पालक आपल्याशी जसे वागले, तसेच आपण आपल्या मुलांशी वागतो. जर आपल्या पालकांनी आपल्याला कडक शिस्तीत ठेवले असेल, तर आपणही नकळतपणे तीच पद्धत अवलंबतो. यात मुलाच्या वैयक्तिक गरजांचा आणि बदलत्या काळाचा विचार केला जात नाही.
बऱ्याच पालकांना वाटते की जे आपण करू शकलो नाही, ते आपल्या मुलाने करून दाखवावे. मुलांच्या भावना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर स्वतःच्या इच्छा लादतात. यामुळे मुलाच्या नैसर्गिक छंदांची गळचेपी होते. मुलांकडून असलेल्या आपल्या अवास्तव अपेक्षांमुळे मुलांचे व्यक्तिमत्त्व दाबले जाते. मुलाने प्रत्येक विषयात अव्वलच आले पाहिजे किंवा त्याने आपल्यासारखेच उच्च पद मिळवले पाहिजे, हा अट्टाहास करू नये.
आपल्या मुलाची जर आपण सतत तुलना शेजारच्या किंवा नातेवाईकांच्या मुलांशी करत असु तर मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो. "मी पुरेसा चांगला नाही" ही भावना त्यांच्या मनात घर करते. वयात आल्यावर ही मुले पालकांपासून गोष्टी लपवू लागतात. पालकांशी असलेले नाते केवळ गरजांपुरते उरते आणि भावनिक जवळीक संपते.
यासाठी सजग पालकत्व हा प्रभावी मार्ग आहे. म्हणजे थोडक्यात काय तर..मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी केवळ अभ्यासाविषयी नाही, तर त्यांच्या आवडीनिवडी आणि भावनेबद्दलही बोला.मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा तुमच्या वेळेची जास्त गरज असते. दिवसातून किमान एक तास कोणताही अडथळा (मोबाईल, टीव्ही) न ठेवता मुलांसोबत खेळा किंवा गप्पा मारा. quality time देणे गरजेचे आहे. पालकांनी स्वयंपरीक्षण करणे आवशक्य आहे.
अजाण पालकत्व हे कोणा एका पालकाचे दोष नसून ते अनावधानाने घडणारे वर्तन आहे. मात्र, एकदा का आपल्याला याची जाणीव झाली, की आपण त्यात सुधारणा करू शकतो. यासाठी वेळीच मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. Mindful Parenting, Mobile deaddiction, stress management आश्या विविध बाबींवर योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता.
एक मानसोपचारतज्ञ म्हणून मी तुम्हाला सजग पालकत्वासाठी काही टिप्स सांगू इच्छिते ....
१) मुलाचे पूर्ण बोलणे संपेपर्यंत मध्ये बोलू नका. त्यांना प्रश्न विचारा जेणेकरून त्यांना वाटेल की तुम्हाला त्यांच्या गोष्टीत रस आहे.
२) तुम्ही जर तणावात असाल, तर त्याचा राग मुलांवर निघण्याची शक्यता असते. अशा वेळी मुलांना स्पष्ट सांगा, "बाळा, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, आपण १० मिनिटांनी खेळूया का0"
३) मुलांच्या आयुष्यात एक शिस्तबद्ध नित्यक्रम (routine) ठेवा. जेवण, झोप आणि खेळाची वेळ निश्चित असल्यास मुले अधिक सुरक्षित आणि शांत अनुभवतात. जर घरातील मोठी माणसे वेळेवर जेवत असतील आणि रात्री वेळेत झोपत असतील, तर मुलांच्या शरीरालाही तशीच सवय लागते. यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होते.
४) दिवसातून काही वेळ मुलांसोबत निसर्गात किंवा बागेत घालवा. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते.
५) आजच्या डिजिटल युगात ''डिजिटल डिटॉक्स'' (Digital Detox) ही काळाची गरज आहे. मुले पालकांचे शब्द ऐकत नाहीत, तर त्यांच्या कृतींचे प्रतिबिंब असतात. जेव्हा पालक स्वतः मोबाईलचा मोह टाळून व्यायामाला आणि कुटुंबाला वेळ देतात, तेव्हा मुलांच्या मनात शिस्तीचे संस्कार आपोआप रुजतात. जेव्हा मुले तुम्हाला फोनपेक्षा पुस्तकात किंवा संवादात रमलेले पाहतात, तेव्हा तीही आपोआप मोबाईलपासून दूर राहतात.
पालकत्व म्हणजे केवळ मुलाला घडवणे नाही, तर मुलासोबत स्वतःलाही घडवणे आहे. जेव्हा आपण सजग होतो, तेव्हा आपण केवळ चांगले पालकच नाही तर आपल्या मुलाचे सर्वात मोठे आधारस्तंभ बनतो.मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात, त्यांना आकार देताना पालकांनी सजग असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण आपल्या मुलांना समजून घेतले आणि त्यांना प्रेमासोबतच योग्य स्वातंत्र्य दिले, तरच ती एक जबाबदार आणि आनंदी व्यक्ती म्हणून घडतील.

-------

(लेखक सुवर्णपदकप्राप्त मानसोपचारतज्ञ , व्यसनमुक्तीतज्ञ व समुपदेशक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com