''समस्यापूर्ती'' काव्यलेखन स्पर्धेत अतुल देशपांडे प्रथम

''समस्यापूर्ती'' काव्यलेखन स्पर्धेत अतुल देशपांडे प्रथम

Published on

‘समस्यापूर्ती’ काव्यलेखन स्पर्धेत अतुल देशपांडे प्रथम
मसाप, कोमसाप चा पुढाकार ; जगभरातून ५४८ कविता दाखल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय ‘समस्यापूर्ती’ काव्यलेखन स्पर्धेत नाशिकचे अतुल नरहर देशपांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, पुणे येथील किरण वेताळ यांनी द्वितीय, तर मुंबईचे डॉ. मनोज सूर्यकांत वराडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.
साहित्य इतिहासातील हा अशा प्रकारचा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याने बृहन्महाराष्ट्रासह जगभरातील मराठी कवींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता होती. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये विजय यशवंत सातपुते (पुणे), विजया गुळवणी (पुणे), वृंदा सचिन कुलकर्णी (पालघर), सुधीर सोमकांत नागले (रायगड) आणि हर्षदा सुंठणकर (बेळगाव) यांनी यश संपादन केले आहे. तसेच, मराठी मुलखाबाहेर आणि परदेशात राहून साहित्य साधना करणाऱ्या कवींसाठी विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके जाहीर केली असून, यामध्ये सुजाता संजय (लंडन), डेविड पेनकर (इस्रायल), शर्मिला पटवर्धन (बंगळुरू), सुषमा राम वडाळकर (बडोदे), कविता पुणतांबेकर ‘कुमुद’ (इंदूर) यांच्यासह जिल्ह्यातील सारिका दत्तात्रय बिवलकर (रत्नागिरी) आणि मेधा विनायक लोवलेकर (चिपळूण) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी जगभरातून ५४८ कविता दाखल झाल्या होत्या. त्यापैकी तांत्रिक कारणास्तव काही कविता वगळून ५२० कविता कोडिंग प्रक्रियेसाठी निवडण्यात आल्या. पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झालेल्या या निवडीमध्ये कवीचे नाव व पत्ता गोपनीय ठेवून केवळ क्रमांकाद्वारे परीक्षण करण्यात आले. पहिल्या फेरीत प्रा. मोहन कुंभार, कल्पना दुधाळ, विजय जोशी व प्रा. अंजली बर्वे यांनी १०२ कवितांची निवड केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत अरुण म्हात्रे, डॉ. अनुजा जोशी, प्रा. एल. बी. पाटील आणि मंदार ओक यांनी अंतिम निकाल निश्चित केला आहे.

चौकट
पारितोषिक वितरण २१ फेब्रुवारी रोजी
प्रसिद्ध कवितेची ओळ घेऊन मूळ कवितेपेक्षा वेगळ्या धाटणीची सद्यःस्थितीवर भाष्य करणारी कविता रचणे, असे या स्पर्धेचे कल्पक स्वरूप होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चिपळूण येथे होणार असून, साहित्यानुरागींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संतोष गोनबरे आणि अरुण इंगवले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com