नंदीबैलाचा ''गुबूगुबू'' आवाज होतोय मूक
rat25p10.jpg-
19956
घरोघरी फिरणारा नंदीबैल
नंदीबैलाचा ‘गुबूगुबू’
आवाज होतोय मूक
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम ; लोककला लोप पावण्याच्या वाटेवर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ः ‘पाऊस पडेल का ’, ‘यंदा लग्न होईल का’, ‘भरपूर पैसा येईल का?’... असे प्रश्न विचारले की लगेच मान हलवून ''हो'' म्हणणारा नंदीबैल आणि त्याच्या सोबतीला कानी पडणारा ''गुबूगुबू'' असा वाद्याचा आवाज... हे दृश्य काही वर्षांपूर्वी कोकणच्या ग्रामीण भागात पहायला मिळत होते. मात्र, काळाच्या ओघात ही लोककला आणि त्यासोबत येणारे कलाकार आता लोप पावत आहेत. एकेकाळी घराघराच्या उंबरठ्यावर दिसणारे नंदीबैल आता क्वचितच पाहायला मिळत असल्याने, नव्या पिढीला त्याचे केवळ कुतूहल उरले आहे.
बळीराजाशी असलेले नाते तुटले कोकणात खरीप हंगामाला सुरुवात झाली की वासुदेव, बहुरूपी, नंदीवाले आणि कडकलक्ष्मी यांसारख्या लोककलाकारांची वर्दळ वाढायची. शेतात, खळ्यावर किंवा मळ्यावर हे कलाकार यायचे आणि बळीराजाही मोठ्या मनाने त्यांना पसाभर धान्य द्यायचा. नंदीबैलवाल्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज जर खरा ठरला, तर पुढच्या वेळी त्यांचे अधिक आदरातिथ्य व्हायचे. मात्र, आता शेतीचे स्वरूप बदलले आणि त्यासोबतच हे नातेही विरळ होत चालले आहे. बंगल्याच्या भिंतीआड हरवले प्रेम खेडेगावांचे आता वेगाने शहरीकरण होत आहे. मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या मजल्यांनी घेतली आहे. पूर्वी घराबाहेर काम करणारी माणसे आता एसीच्या गारव्यात बसू लागली आहेत. "बाहेर कुणी कलाकार येऊन उभा राहिला, तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही," अशी खंत काही बहुरूपी व्यक्त करतात. पोटाची खळगी भरेल इतपत धान्य किंवा मिळणारे प्रेम कमी झाल्याने, ही कला जोपासणारी नवी पिढी आता व्यवसायाकडे वळू लागली आहे.
संस्कृती जपण्याचे आवाहन आधुनिक जीवनशैली जगताना आपली संस्कृती आणि परंपरा जपणे आवश्यक आहे. सध्या अनेक जुन्या गोष्टी पुन्हा एकदा फॅशन म्हणून उदयास येत आहेत. त्याचप्रमाणे या लोककलांचे महत्त्व ओळखून त्यांना राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला, तरच हा ''गुबूगुबू'' आवाज भविष्यात ऐकू येईल, अन्यथा या गोष्टी केवळ चित्रफितींपुरत्याच मर्यादित राहतील अशी भीती व्यक्त होत आहे.
चौकट
लोककलांची परंपरा
उंबरठ्यावरची समृद्धी वासुदेव, नंदीबैल, कडकलक्ष्मी हे केवळ भिक्षेकरी नसून ते लोकसंस्कृतीचे वाहक आहेत. मनोरंजनासोबतच समाजाला नीतिमत्ता शिकवणारी ही एक अनौपचारिक शिक्षण पद्धतीच होती. मात्र, तांत्रिक युगात या कलेला उतरती कळा लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

