नेत्यांची वर्चस्वासाठी लढाई
20017
प्रदीर्घ काळापासून प्रलंबित राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण राजकारणात अपारंपरिक मतदारसंघ कायम आहेत, तर आरक्षण सोडतीत अनेकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राजकीय उत्साह संचारला असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने रणकंदन सुरू झाले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात खऱ्या अर्थान लढत होणार आहे ती शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात. यंदाच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी यापेक्षाही जिल्हास्तरावर पक्ष म्हणून स्वतःची ताकद ग्रामीण भागात दाखवण्याचाच प्रयत्न सर्वाधिक सुरू आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणासोबत आहे, याबाबत निश्चितच गोंधळाची परिस्थिती आहे. यानिमित्ताने भाजप ग्रामीण भागात बळ वाढविण्याचा प्रयत्न करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसही (अजित दादा गट) स्व-बळातून परीक्षेला सामोरे जात आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असली, तरीही यानिमित्ताने वर्चस्वासाठी नेत्यांची मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
- मुझफ्फर खान, चिपळूण
--------
नेत्यांची वर्चस्वासाठी लढाई
ग्रामीण आखाडा ; कोण कोणासोबत याचा गोंधळ
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत आणि पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरी मतदारांचा कौल युतीच्या बाजूने राहिला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पहिल्या क्रमांकावर आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिली. आता ग्रामीण मतदारांच्या मनात काय आहे, हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर येणार आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीला ग्रामीण भागात पाय रोवायचे असल्याने त्यांची यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात ढोबळपणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण असले, तरी पालिका निवडणुकीत हे समीकरण विस्कळीत होते. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परीषद व पंचायत समित निवडणुकांमध्ये दिसत आहे. अर्ज भरण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महायुती झाली असे चित्र नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्र लढत आहे. तसेच शिंदे शिवसेनेने भाजपला काही ठिकाणी जिल्हापरीषदेच्या जागा वाटपात स्थानच दिलेले नाही. त्यांना चारच तालुक्यात मर्यादित ठेवल्याचे दिसत आहे. ही शिंदे शिवसेनेची रणनिती असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. तर ग्रामीण भागात क्षमता कमी असल्याने शिंदे शिवसेनेबरोबर तडजोड करण्याचाच पवित्रा भाजपने अवलंबल्याचे दिसत आहे. त्यामुळे बंडखोरीची लागण काहीठिकाणी झाल्याचे दिसते. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव असून इतर छोटे पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय स्थिती विस्कळीत असून दोन्ही सेना एकमेकासमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. शिंदे शिवसेनेकडे मोठमोठ्या नेत्यांची फळी आहे, तर ठाकरे सेनेला गटातील शिलेंदारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
-------
आठ वर्षांनंतर निवडणूक
रत्नागिरी जिल्हा परिषदेची २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर २० मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद आणि २२ मार्च २०२२ मध्ये ९ पंचायत समित्यांची मुदत संपली. मात्र, कोरोना, पाऊस आणि ओबीसी राजकीय आरक्षणामुळे निवडणुका वेळेवर होऊ शकल्या नाहीत. परिणामी, मिनी मंत्रालयाचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समित्यांची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा ४६ महिने प्रशासकीय राजवट राहिली. यापूर्वी १९८२ ते १९९२ या काळात दहा वर्षे प्रशासक होते. आता तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक होत आहे.
------
बंडखोरी थांबवण्यात सत्ताधाऱ्यांना यश
राज्यात भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली असती, तर जागावाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि बंडखोरी वाढली असती. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीबाहेर ठेवून शिवसेना-भाजपने निवडणुका लढवल्या. रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपालिकांसह लांजा नगरपंचायतीत युतीला बहुमत मिळाले. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत, तर खेडमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांनी एकहाती वर्चस्व राखले. चिपळूणमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठी कामगिरी करता आली नाही. काँग्रेसकडे नेतृत्व नसतानाही त्यांचे तीन नगरसेवक निवडून आले. खेडमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नाही. महायुतीऐवजी केवळ ''युती'' करून निवडणुका जिंकता येत असल्यामुळे शिवसेना-भाजपने राष्ट्रवादीला जिल्हा परिषद निवडणुकीतही बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे बंडखोरी रोखण्यात त्यांना यश आले.
-------
ग्रामीण चेहऱ्याला भाजपची पसंती
लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडून आल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच पैकी केवळ गुहागरची जागा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे महाविकास आघाडीला मिळाली. भाजपने यावेळी जाणीवपूर्वक ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या नेत्यांना पक्षात स्थान दिले असून त्यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. ग्रामीण भागाचे प्रश्न (शाळा, आरोग्य, रस्ते) केंद्र व राज्य सरकारने कसे सोडवले, याचा हवाला देऊन शिवसेना-भाजप रिंगणात उतरले आहेत. ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच सत्ता’ हा मुद्दा सत्ताधारी मांडत आहेत, तर विरोधक लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करत आहेत.
-
सत्ता शिवसेनेची, पण समीकरणे बदलती
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर १९९७ पासून शिवसेनेची एकतर्फी सत्ता आहे. २००९ मध्ये राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही जिल्हा परिषद शिवसेनेकडेच राहिली. मात्र, अध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांना अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेची एकतर्फी सत्ता होती. भाजपचा एकही सदस्य जिल्हापरिषदेत नव्हता.
-----
अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
जिल्हा परिषद अध्यक्षपद ''नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)'' या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना (पत्नी, मुलगी किंवा सून) रिंगणात उतरवले आहे. अध्यक्षपद आपल्याच मतदारसंघात राहावे, यासाठी शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांमध्ये पडद्यामागून मोठी स्पर्धा सुरू आहे.
-----
शिवसेनेत नेतृत्वाची लढाई
२०२२ मध्ये शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट जिल्ह्यात तग धरून आहे. तेही दोन मंत्री आणि त्यांचा असलेला तळागाळातील संपर्क यामुळे. मात्र ठाकरे शिवसेनेची तशी स्थिती नाही. मुख्य फळीतील दोनच नेत शिल्लक असून त्यांच्यामध्येही एकमत नाही. पक्ष फुटीनंतर दुसऱ्या फळीतीलही काही नेते पक्षातून बाहेर पडल्यानंतर नेतृत्व करणाऱ्यांची उणीव ठाकरे सेनेला भासत आहे. त्यामुले नेत्यांची फळी कमकुवत असल्याचे दिसत आहे. रत्नागिरीत बाळ माने यांच्यापुढे पालकमंत्री उदय सामंत यांचे आव्हान आहे. चिपळूणमध्ये ठाकरे गटाची ताकद असली, तरी विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील वादाचा फटका पक्षाच्या जडणघडणीला बसत आहे. लांजा-राजापूरमध्ये तर यापेक्षाही बरी स्थिती नाही. खेड, मंडणगड, दापोलीमध्ये माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचा सुपूत्र गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे तळागाळात ठाकरे शिवसेनेविषयी सहानुभूती असली तरीही नेत्याची उणिव भासत आहे.
----------
२०२९ च्या विधानसभेची तयारी
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अनेकांनी २०२९ च्या विधानसभेची तयारी सुरू केली आहे. राजकारणाचा पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवता आली, तर त्याचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. रत्नागिरी, राजापूर आणि दापोली मतदारसंघात शिवसेनेने भाजपला फारशा जागा दिलेल्या नाहीत, मात्र चिपळूणमध्ये भाजपला संधी दिली आहे. भाजपला किती यश मिळणार, यापेक्षा भाजपचे ‘चिन्ह’ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात पक्षाच्या नेत्यांना अधिक रस आहे.
------
चौकट
निवडणूक सांख्यिकी (पॉइंटर)
* रत्नागिरी जिल्हा परिषद गट : ५८
* पंचायत समिती सदस्य संख्या : ११२
* एकूण मतदार : ११,७३,८९९
* पुरुष मतदार : ५,६४,९७६
* महिला मतदार : ६,०८,९१३
------
चौकट
- रत्नागिरी जिल्हा परिषद २०१७ मधील राजकीय बलाबल
* एकूण जागा ५५
* शिवसेना ३९
* राष्ट्रवादी १६
--------
कोट १
रत्नागिरी जिल्ह्यात पालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्विकारले. ग्रामीण भागातील मतदार सुद्धा शिंदे सेनेला म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा स्विकार करतील. कारण बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हे तळागाळातील शिवसैनिकांना माहिती आहे.
-सदानंद चव्हाण, उपनेते, शिवसेना (शिंदे गट)
----
कोट २
भाजप हा केवळ शहरी भागाचा पक्ष नाही. सामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्याचा फायदा निश्चितच भाजपला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल. आम्ही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगले यश मिळवू शकतो.
- वैभव खेडेकर, खेड
------
कोट ३
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर राज्यात प्रामाणिक राहिलो. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती व्हावी, अशी आमची इच्छा होती. पालिका निवडणुकीत महायुती होईल, असे आम्हाला सांगितले गेले. त्यानंतर ऐनवेळी फक्त युतीच झाली. त्यामुळे आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागली. आताही तशीच स्थिती आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढवू आणि मिळेल ते यश आम्हाला मान्य असेल.
- बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
---------
कोट ४
चिपळूण शहर वगळता ग्रामीण भागात भाजपला जागा वाटपात स्थान मिळाले नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात संघटना वाढत आहे. त्यामुळे पंचायत समितीत सात जागा मिळाल्या आहेत. तीन जिल्हापरिषद गटातही उमेदवारी मिळाली आहे. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात आम्ही संघटना पोहोचवण्यात यशस्वी होऊ. मतदारसंघातील विकास कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला खासदार नारायण राणे यांची साथ आहे.
- प्रशांत यादव, नेते भाजप
-------
कोट ५
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्याचे काम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. मराठी माणसाच्या हितासाठी निर्माण झालेली शिवसेना कोकणात वाढवण्याचे काम आम्ही केले. सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन कोकण हिताचे निर्णय घेत आहोत. मात्र राज्यात सत्तेवर आलेले महायुतीचे हे सरकार संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी आहे. विविध कारणांनी सत्ताधारी विरोधी पक्ष कमकुवत करण्याचे काम करीत आहे. या निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल.
- विनायक राऊत, माजी खासदार (शिंदे सेना)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

