सीमेवर शौर्य, आता गावात स्वामित्व

सीमेवर शौर्य, आता गावात स्वामित्व

Published on

लोगो - विधायक
--
19994

सीमेवर शौर्य, आता गावात स्वामित्व

कलंबिस्तचे माजी सैनिक; परप्रांतीयांना जमिनी न विकण्याचा ठराव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः कलंबिस्त गाव सैनिक परंपरा लाभलेला भाग असून, गेल्या काही काळापासून गावातील जमिनी बाहेरील एजंटांमार्फत परप्रांतीयांना विकल्या जात आहेत. हे व्यवहार रोखण्यासाठी आणि गावच्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी आता गावातील माजी सैनिक एकवटले आहेत. कलंबिस्त माजी सैनिक संघटनेच्या वार्षिक सभेत गावातील जमिनी बाहेरील व्यक्तींना विकू नये, असा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
​कलंबिस्त हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आणि ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. शेती हा गावचा मुख्य आधार असून ग्रामस्थांचे जीवन त्यावर अवलंबून आहे; मात्र काही स्थानिक दलाल आणि परराज्यातील टोळ्या शेतकऱ्यांची फसवणूक करून मोक्याच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी सैनिक संघटनेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
​या बैठकीला माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ सावंत, अरुण सावंत, अनंत सावंत, विश्वजित सावंत, सगुण पास्ते, सुरेश गावडे, प्रकाश सावंत, सखाराम बिडवे, भगवान पास्ते, विलास पास्ते, धोंडी सावंत, सुभाष सावंत, संजय सावंत, यशवंत तावडे, अरुण पास्ते, जयश्री गावडे व मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. ​देशाच्या सीमेवर रक्षण केल्यानंतर आता गावाच्या रक्षणासाठी आणि पूर्वजांनी राखलेली जमीन टिकवण्यासाठी माजी सैनिकांनी घेतलेला हा पुढाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श ठरत आहे.
----
...तर खपवून घेतले जाणार नाही!
​सभेत घेतलेल्या निर्णयानुसार, गावातील कोणीही आपली जमीन किंवा निवासी जागा परप्रांतीय व्यक्तींना विकू नये, असे आवाहन केले आहे. जर एखाद्या खातेदाराला जमीन विकणे अनिवार्य असेल, तर ती जमीन गावातीलच स्थानिक व्यक्तीला विकावी. बाहेरील एजंटांना जमीन दिल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ​या ठरावाची प्रत कलंबिस्त ग्रामपंचायतीला देण्यात आली असून, येत्या उद्या (ता. २६) होणाऱ्या ग्रामसभेत यावर धोरणात्मक निर्णय घेऊन तो जिल्हाधिकारी व सावंतवाडी तहसीलदारांना पाठवावा, अशी विनंती सरपंच सपना सावंत यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com