संगमेश्वर-तळवडेच्या सुकन्येची सुरक्षा दलात निवड
rat25p22.jpg-
सुगंधा तिरमल
तळवडेच्या सुकन्येची सुरक्षा दलात निवड
सुगंधा तिरमल ; प्रतिकूल परिस्थितीत वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः शाळा, महाविद्यालयात जाण्या साठी वाहन नसल्याने दररोज ८ किलोमीटर पायी प्रवास, प्रशिक्षणासाठी कोणतीही अकॅडमी नाही, दररोज तळवडे गाव ते टिकळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर धावण्याचा सराव, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची मात्र त्यासाठी अहोरात्र घेतलेली मनात जिद्द होती वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे. तिने घेतलेली मेहनत अखेर फळाला आली. सुगंधा संतोष तिरमल हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली आहे.
आई, वडील, पाच मुली असे तिरमल यांचे कुटुंब. मोलमजुरी करून पाचही मुलींना लहानाचे मोठे केले. सुगंधाचे वडील संतोष तिरमल यांना पोलिसमध्ये भरती व्हायचे होते. मात्र काही अडचणीमुळे ते पोलिस होवू शकले नाहीत. मात्र सुगंधा हिने पोलिस होऊन वडिलांची इच्छा सत्यात उतरवायची असा चंग मनाशी बाळगला. तळवडे ते देवरुख व पुन्हा देवरुख असा दररोज ८ किमीचा पायी प्रवास सुरू होता. तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी तिला निखिल कोळवणकर, सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिस होण्याचे स्वप्न सुगंधाला सतावत होते. २०१९ मध्ये मुंबई येथे पोलिस भरतीमध्ये ती सहभागी झाली होती. त्यावेळी प्रतीक्षा यादीत तिचे नाव लागले. २०२४-२५ मध्ये सिंधुदुर्ग येथील भरतीमध्ये सहभागी झाली होती. क्रीडा कोटातून ४ जागा होत्या. सुगंधाचे दोन नंबरला नाव होते. मात्र दोन्ही पुरुष उमेदवारांची भरती केली गेली अन् सुगंधाच्या पदरी निराशा पडली. पुन्हा मुंबई येथील प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. पुणे दौड येथे ३ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत प्रशिक्षणासाठी सुगंधाला बोलावणे आले अन् तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. याच ठिकाणी तिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली. या संपूर्ण वाटचालीमध्ये आई-वडिलांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव, प्रकाश खांडेकर, दीपक तिरमल आदींचे मार्गदर्शन लाभले.
----
चौकट
मोठ्या बहिणीने भावंडांसाठी सोडले शिक्षण
सुगंधाची मोठी बहीण सुचिताने आपली भावंडे शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हावीत यासाठी सातवीतून शिक्षण अर्धवट सोडले. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मुंबई येथे घरकामाला सुरवात केली. यातून मिळणारी रक्कम ती दरमहा वडिलांकडे पाठवत होती. यातूनच चार बहिणींचे शिक्षण सुरू आहे.
-----------
कोट
महाराष्ट्र पोलिस दलात सहभागी व्हायचेय असा चंग मनाशी बांधला होता. महाराष्ट्र पोलिस हॉकी टीममधून खेळ करण्याचे ध्येय होते. कोणत्याही क्षेत्रात अपयश आल्यास खचून जायचे नाही. सदैव प्रयत्न सुरू ठेवायचे, अंगी प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास उराशी सदैव बाळगा.
- सुगंधा तिरमल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

