कोकणात पर्यटकांचा महापूर

कोकणात पर्यटकांचा महापूर

Published on

२००२८
२००२९

२००१३
२००६४

जिल्ह्यात दोन दिवसांत पाच कोटींची उलाढाल
पर्यटकांमुळे ‘अच्छे दिन’ ः पुळ्यातील गणरायाचे ७५ हजार भक्तगणांनी घेतले दर्शन
सकाळ वृत्तेसवा
दापोली/संगमेश्वर, ता. २५ ः प्रजासत्ताक दिनासह सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला बूस्टर मिळाला आहे. मुंबई, पुण्यासह परराज्यातून हजारो पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले असून, केवळ दोन दिवसांत जिल्ह्यात ५ कोटींहून अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणपतीपुळेत दोन दिवसांत ७५ हजार पर्यटक आल्याची नोंद झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
दापोलीच्या किनाऱ्यांवर गर्दी झाली असून, दिवाळी सुट्यांनंतर प्रथमच कोकणात पर्यटकांची एवढी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दापोलीतील मुरुड, कर्दे, लाडघर, पाळंदे, हर्णै व आजर्ले हे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. केवळ किनारेच नव्हे, तर शहरातील हॉटेल्स, लॉजेस आणि ‘होम स्टे’ पूर्णतः बुक झाले आहेत. गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर, वेळणेश्वर आणि कशेळी येथेही अशीच स्थिती असून, वॉटर स्पोर्टस्‌ आणि पॅरासेलिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनी अस्सल कोकणी खाद्यसंस्कृतीला पसंती दिली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या माहितीनुसार, ताजी मासळी आणि चिकन थाळीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. शाकाहारी पर्यटकांमध्ये ‘उकडीच्या मोदकां’ना विशेष मागणी असून, बाजारपेठेत मोदकांची मोठी विक्री होत आहे.


विघ्नहर्त्याची ओढ
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेत शनिवारी ३५ हजार, तर रविवारी ४० हजारांहून अधिक पर्यटक येऊन गेल्याची नोंद श्रींच्या मंदिरात झाली. सोमवारी (ता. २६) दिवसभरात ३५ हजार पर्यटक येऊन जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे एकट्या गणपतीपुळेत सरासरी पर्यटकाने ५०० रुपये खर्च केल्याचा अंदाज धरला, तर सुमारे पाच कोटींची उलाढाल झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे यंदा पर्यटन व्यवसायाला उभारी मिळाल्याचे दिसत आहे.

चौपदरीकरणाचा फटका
संगमेश्‍वरवासीयांना
पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर परिसरात वाहतुकीचा ताण वाढला आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे संगमेश्वर एसटी स्थानकासमोर सुमारे दीड किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सोनवी पुलादरम्यान नियोजनाचा अभाव असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली, ज्याचा फटका स्थानिक बाजारपेठेलाही बसला.

आंबेड पोलिसपाटलांची धाव
शनिवारी संध्याकाळी उशिरा संगमेश्वर चौकात पोलिस उपस्थित नसल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प होती. एसटी बससह अनेक वाहने अडकून पडली असताना आंबेडचे पोलिसपाटील सुरेश रहाटे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शिस्तबद्ध पद्धतीने वाहतूक सुरळीत केली आणि अडकलेल्या प्रवाशांना दिलासा दिला.

पर्यटकांच्या आनंदात
नेटवर्कचे विरजण
निसर्गाचा आनंद घेत असताना मुरुड परिसरात मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. नेटवर्क नसल्याने फोटो शेअर करणे किंवा तातडीचे कॉल करणे कठीण झाल्याच्या तक्रारी पर्यटकांनी केल्या आहेत.

कोट १
कोकणात येणं म्हणजे आपलंसं वाटणं. आयुष्यात चांगले दिवस घालवायचे असतील, तर वर्षातून एकदा तरी कोकणात यायलाच हवं.
- श्रीकांत सावंत, पर्यटक, पुणे

कोट २
सलग सुट्यांमुळे आमचे रिसॉर्ट पूर्णपणे बुक झाले होते. दिवाळीनंतरची ही पहिली मोठी गर्दी असून, स्थानिक पर्यटन व्यवसायासाठीही दिलासादायक बाब आहे.
- नीलेश मुकादम, रिसॉर्ट व्यावसायिक, दापोली

दृष्टिक्षेपात
वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल
समुद्र किनाऱ्यांना प्राधान्य
मच्छी व्यावसायिकांना लाभ
हर्णै किल्ला पाहण्यासाठी गर्दी
आरे-वारे, कशेळीत राबता वाढला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com