खारभूमी बंधाऱ्याची झडपे तोडल्याने शेती धोक्यात
- rat२७p२३.jpg-
P२६O२०२२६
रत्नागिरी ः तालुक्यातील गावडे आंबेरे बिर्जेवाडी ते पूर्णगडदरम्यान बांधण्यात आलेल्या खारभूमी बंधाऱ्याची झडपे तोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात भरतीचे खारे पाणी वाहताना दिसत आहे.
----
बंधाऱ्याची झडपे तोडल्याने शेती धोक्यात
गावडेआंबेरे-पूर्णगड येथील प्रकार; सुपीक जमीन धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २७ : रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे बिर्जेवाडी ते पूर्णगड दरम्यान बांधलेल्या खारभूमी बंधाऱ्याची झडपे मच्छीमारीकरिता वारंवार तोडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीमध्ये खारे पाणी शिरत असून, एकेकाळी सुपीक झालेली शेकडो एकर जमीन पुन्हा नापीक होत आहे. जमिनीसोबतच पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे पाणीही खारे होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, झडपे तोडणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे, मावळंगे, नातुंडे, जांभूळआड या परिसरात पूर्णगड खाडीचे खारे पाणी शिरून जमिनी नापीक होत असल्याच्या समस्येवर तोडगा म्हणून सुमारे २० वर्षांपूर्वी खारभूमी विभागाने हा बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता; केवळ शेतीच सुस्थितीत आली नाही तर या बंधाऱ्याने दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचेही (सेतू) काम केले होते. या प्रकल्पामुळे परिसरातील गोड्या पाण्याच्या विहिरींची पातळी आणि प्रत सुधारली होती, ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी होत होता; मात्र, गेल्या काही काळापासून या सुस्थितीला दृष्ट लागली आहे.
काही स्थानिक मच्छीमारांना या परिसरातील मासेमारी करणे अवघड झाल्याच्या कारणावरून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी या बंधाऱ्याची झडपे वारंवार तोडण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी खारभूमी विभागाने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव १५ ते २० झडपांची दुरुस्ती करून त्या पूर्णपणे बंदिस्त केल्या होत्या, ज्यामुळे भरतीचे पाणी रोखण्यात यश आले होते; मात्र, काही समाजकंटकांकडून ही झडपे पुन्हा तोडली जात असल्याने समुद्राचे भरतीचे पाणी थेट शेतात आणि बागांमध्ये घुसून नारळ, सुपारी व भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. मोजक्या लोकांच्या मासेमारी व्यवसायासाठी शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच राज्याच्या खारभूमी मंत्र्यांना भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
-----
कोट
खारभूमी बंधाऱ्यामुळे आमच्या भागातील भातशेती, नारळ आणि सुपारीच्या बागांना सुगीचे दिवस आले होते. विहिरींचे खारे पाणी कमी होऊन ते पिण्यायोग्य झाले होते; परंतु, झडपे वारंवार तोडली जात असल्यामुळे प्रत्येक भरतीच्या वेळी परिसरातील बागांमध्ये पाणी साचत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत संबंधित खात्याला वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- योगेश केळकर, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

