

rat२७p३.jpg-
P२६O२०१४५
रत्नागिरी- उपोषणकर्ते ॲड. गौरव शेलार यांच्याशी चर्चा करताना जिल्हा भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी.
-----
कामकाजातील चूक भूमी अभिलेखकडून मान्य
ॲड. शेलार यांचे उपोषण यशस्वी; सुधारणा करण्याबाबत पालकमंत्र्यांची सूचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : येथील जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभाराविरोधात प्रजासत्ताक दिनी सुरू केलेल्या उपोषणाची पालकमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली. कामकाजातील चूक प्रशासनाने मान्य केली असून ती तत्काळ दुरुस्त करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत, अशी माहिती अॅड. गौरव शेलार यांनी दिली.
ॲड. शेलार आणि देवेंद्र शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. ॲड. गौरव शेलार यांच्या स्वतंत्र मालकीच्या जागेच्या नकाशामध्ये भूमी अभिलेख विभागाकडून गंभीर चूक झाली होती. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही विभागाकडून दाद मिळत नव्हती. प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी शेलार यांनी २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. उपोषणाची तीव्रता पाहता प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली होती. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी उपस्थित होते. त्या वेळी पालकमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नावर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकाशामध्ये झालेली चूक पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर मान्य केली. या प्रकरणाची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेत ‘संबंधित चूक तत्काळ दुरुस्त करा आणि शेलार यांच्या मागण्या पूर्ण करा,’ असे कडक आदेश दिले. प्रशासनाने दिलेल्या लेखी आणि तोंडी आश्वासनानंतर, तसेच पालकमंत्र्यांच्या सकारात्मक मध्यस्थीनंतर ॲड. गौरव शेलार यांनी आपले उपोषण तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला.
----