भाजी मंडईच्या इमारतीतील पाणी आटेना

भाजी मंडईच्या इमारतीतील पाणी आटेना

Published on

swt288.jpg
20476
सावंतवाडी ः संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर साचत असलेले पाणी.
swt289.jpg व swt2811.jpg
20477, 20461
ठेकेदार पंपाद्वारे साचत असलेल्या पाण्याचा उपसा करत आहे.

भाजी मंडईच्या इमारतीतील पाणी आटेना
डोकेदुखी वाढली; तळमजल्यावरील स्लॅब तुंबला
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर मोती तलावाच्या पाण्याचा शिरकाव अजूनही सुरू असून चक्क दररोज मोटर पंपाने हे पाणी बाहेर उपसण्याची वेळ संबंधित ठेकेदारावर आली आहे. इमारतीच्या तळमजल्याच्या स्लॅबखाली पूर्णतः पाणी तुंबलेले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने ही इमारत शहरातील दुसरी संचयनी झाल्यास आश्चर्य वाटायला नको, अशा प्रतिक्रिया संतप्त नागरिकांतून उमटत आहेत.
शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या जुन्या इमारतीच्या जागेवर नव्याने प्रशस्त भाजी मंडई उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत या इमारतीच्या दोन मजल्यांचे काम पूर्णत्वास आले आहे; परंतु हे काम करत असताना इमारतीच्या फाउंडेशनच्या कामांमध्ये आवश्यक बाबींकडे प्रशासन आणि ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने या इमारतीच्या तळमजल्यामध्ये आजही नजीकच्या मोती तलावातील पाण्याचा शिरकाव होत आहे. दोन वेळा वॉटरप्रूफिंग, शिवाय राफ्ट आणि काँक्रिट टाकूनही हा प्रकार होत असल्याने या इमारतीच्या पार्किंगची व्यवस्था ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, त्याच तळमजल्याचे भवितव्य कठीण बनले आहे. सद्यस्थितीत त्या ठिकाणी तळमजल्यावर स्लॅब टाकण्यात आले आहे. स्लॅबच्या खालचा भाग पूर्णतः पाण्याखाली आहे. या पाण्याला पूर्णतः दुर्गंधी सुटली असून पाणी पूर्णतः कुजून गेले आहे. हे पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी चक्क मोटर पंपचा वापर ठेकेदाराकडून केला जात आहे. दररोज या पाण्याचा उपसा केला जात आहे; परंतु हा प्रकार होत असताना सुद्धा प्रशासनाकडून त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेला असून प्रशासन चुकीच्या कामाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. यासंदर्भात ''सकाळ''ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून वस्तुस्थिती समोर आणून देण्याचे काम केले आहे; मात्र आजही याकडे डोळसपणे पाहिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिकेवर मागची काही वर्षे प्रशासकीय सत्ता होती. या कार्यकाळात संबंधित ठेकेदाराकडून मनमानीपणे काम सुरू होते. पालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले होते. आता पालिकेवर नव्याने भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी तरी या चुकीच्या कामाकडे जाणीव पूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे. तशा प्रकारची मागणी सुद्धा नागरिकांतून होत आहे. ज्याअर्थी मोटर पंपाने हे पाणी बाहेर काढण्याचे काम होत आहे, त्याअर्थी या ठिकाणी पाण्याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्यात इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार हात मोकळे करून गप्प बसणार आहे; परंतु संचयनीसारखा प्रकार या ठिकाणी झाल्यास नंतर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. आताच या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास कुठेतरी मार्ग निघू शकतो, त्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलावे. तसेच नव्याने बसलेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांनीही या कामात लक्ष घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....................
चौकट
साळगावकरांनी वेधले होते लक्ष
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कामाच्या सुरुवातीलाच फाउंडेशनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भविष्यात संचयनी झाल्यास नवल वाटू नये, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यावेळी त्यांच्या या बोलल्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले होते; परंतु भविष्यात खरोखरच त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
....................
चौकट
‘सकाळ’ कडून वारंवार पोलखोल
संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या फाउंडेशनच्या कामातील चुकीच्या पद्धतीवर ''सकाळ''ने सुरुवातीपासूनच आवाज उठवत प्रशासनाचे डोळे उघडण्याचे काम केले आहे; परंतु प्रशासन मुजोर ठेकेदाराच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आज नागरिकांतून उघ़डपणे केला जात आहे. शहरातील संचयनीच्या इमारतीची परिस्थिती पाहता या इमारतीच्या पायाभरणीला आवश्यक असलेली प्रक्रिया करणे गरजेचे होते. तशा प्रकारची सूचनाही संबंधितांकडून देण्यात आली असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी मोती तलावातील पाणी इमारतीमध्ये शिरताना दिसत आहे. भविष्यात हे पाणी प्रशासनाला डोकेदुखी ठरणार आहे. आज पुन्हा एकदा हा प्रकार ''सकाळ'' उघडकीस आणत असून यावर आता तरी प्रशासनाने ''ॲक्शन'' घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com