कणकवलीशी ऋणानुबंध

कणकवलीशी ऋणानुबंध

Published on

कणकवलीशी ऋणानुबंध
- राजेश सरकारे
कणकवली शहराच्या पहिल्‍या पर्यटन महोत्‍सवाला २००३ मध्ये तत्‍कालीन जलसंपदामंत्री अजित पवार स्वत: शहरात आले. सोबत मंत्रिमंडळातील सात मंत्री देखील आणले. एवढेच नव्हे तर ढालकाठीच्या पारावर उभे राहून शोभायात्रेचे स्वागतही केले होते.
-------------
राज्‍यात सहा वेळा उपमुख्यमंत्री, जलसंपदा, अर्थ आदी अनेक खात्‍यांचा पदभार सांभाळणारे अजितदादा पवार यांचा कणकवलीशी देखील ऋणानुबंध राहिला तो, तत्कालीन आणि विद्यमान नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यामुळे. काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन १९९९ मध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. यात सिंधुदुर्गातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्‍ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यात कणकवलीचे तत्‍कालीन सरपंच संदेश पारकर, राष्‍ट्रवादीचे तत्‍कालीन अध्यक्ष (कै.) सुरेश सुद्रीक, राष्‍ट्रवादीचे विद्यमान जिल्‍हाध्यक्ष अबिद नाईक यांचा आणि अजितदादा यांचा थेट संपर्क राहिला होता.
कणकवली नगरपंचायतीची २००३ मध्ये निवडणूक झाली. ही निवडणूक शिवसेना विरोधात राष्‍ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने युती करून लढवली. त्‍यावेळी राज्‍याचे अधिवेशन सुरू होते. निवडणूक कणकवलीची असली तरी तत्‍कालीन शिवसेना नेते आणि राष्‍ट्रवादी पक्षाचे नेते यांची प्रतिष्‍ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. कणकवलीत विजय होणार म्‍हणून शिवसेनेचे नेते त्‍यावेळी शहरावर पुष्पवृष्‍टी करण्यासाठी खास हेलिकॉप्टर घेऊन आले होते. मात्र, त्‍या निवडणुकीत शिवसेनेला अवघ्‍या दोन जागा मिळाल्‍या तर राष्‍ट्रवादी पक्षाला १०, काँग्रेसला ५ आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीत राष्‍ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. या विजयाचा जल्लोष कणकवली शहराबरोबरच विधानसभेतही साजरा करण्यात आला. कणकवलीच्या विजयानंतर राष्‍ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांना थेट उचलून घेतले आणि विधानभवन परिसरात त्‍यांची मिरवणूक काढली होती, अशी आठवण नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज सांगितली.
कणकवली नगरपंचायतीवर राष्‍ट्रवादीचा झेंडा फडकल्‍याने प्रचंड खूष झालेले अजित पवार हे कणकवली पर्यटन महोत्‍सवावेळी छगन भुजबळ यांच्यासह तब्‍बल सहा मंत्र्यांना घेऊन कणकवली पर्यटन महोत्‍सवासाठी २००३ मध्ये हजर राहिले होते. पर्यटन महोत्‍सवाचे उद्‌घाटन त्‍यांच्याच हस्ते झाले. पण, तत्‍पूर्वी निघालेल्‍या शोभायात्रा देखील त्‍यांनी शहरातील ढालकाठी येथील पारावर उभी राहून पाहिली होती. पर्यटन महोत्‍सवाच्या निमित्ताने आलेल्‍या अजित पवार यांनी त्‍यावेळी जलसंपदा विभागाचाही आढावा घेतला आणि अरूणा, नरडवे, टाळंबा, तरंदळे आदी धरणांच्या कामांना निधी देण्यासाठी तरतूद केली होती.
कणकवलीतील पर्यटन महोत्‍सवाबरोबरच मुडेश्‍वर मैदानात बाजारपेठ मित्रमंडळातर्फे भरणाऱ्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठीही अजित पवार आवर्जून येत असत, अशी आठवण पारकर यांनी सांगितली. त्‍यावेळी राष्‍ट्रवादी पक्षात दोन गट होते. मात्र, या दोन्ही गटांना आपल्‍या सोबत ठेवण्याचेही कसब अजित पवार यांच्याकडे होते. सिंधुदुर्गातील कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकत होता. मंत्रालयात त्‍यांच्या दालनातही थेट प्रवेश होता. एवढे सिंधुदुर्गवर त्‍यांचे प्रेम होते. हापूस ही सिंधुदुर्गची ओळख असली तरी काफा फणस अजित पवार यांना प्रचंड आवडत होता. दरवर्षी ते चांगल्‍या जातीचा काफा फणस देखील मागवून घेत असत आणि इथले कार्यकर्ते देखील हक्‍काने त्‍यांच्याकडे फणस नेऊन पोचवत असंत.
कणकवलीत १९८८ मध्ये पहिल्‍यांदाच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झाले. संमेलनाचा मान कणकवली शहराला मिळाला. विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणात संमेलनाची जागा देखील निश्‍चित झाली. मात्र, या संमेलनासाठी येणाऱ्या खर्च करण्याएवढ्या इथल्‍या संस्था सक्षम नव्हत्या. कणकवलीची तत्‍कालीन ग्रामपंचायत देखील आपल्‍या फंडातून एवढा आर्थिक भार उचलू शकत नव्हती. ही बाब कणकवलीचे तत्‍कालीन सरपंच संदेश पारकर यांनी अजित पवार यांना कळवली. त्‍यानंतर त्यांनी तातडीने रोख १० लाख रूपयांची जोडणी करून ती रक्‍कम संमेलनाच्या संस्थेपर्यंत पोचविण्याची व्यवस्था केली होती.
कणकवली नगरपंचायत अस्तित्वात आल्‍यानंतर शहरात सुसज्‍ज उद्यानाची उभारणी सुरू करण्यात आली. यातील श्रीधर नाईक उद्यानाची पायाभारणी अजित पवार यांच्या हस्ते झाली होती. कणकवलीच्या मच्छी मार्केटसाठीही त्‍यांनी निधी उपलब्‍ध करून दिला होता. अजित पवार यांच्या ऋुणानुबंधाच्या अनेक आठवणी अजूनही सिंधुदुर्गवासीयांमध्ये घर करून राहिल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com