आंबा बागायतदारांसाठी अजितदादांनी बँकांनाही ठणकावले

आंबा बागायतदारांसाठी अजितदादांनी बँकांनाही ठणकावले

Published on

कोकणातील बागायतदारांच्या नेहमी पाठीशी
प्रसन्न पेठेंनी जागवल्या आठवणी ; कायम शेतकऱ्यांचे हित जपले

रत्नागिरी ः उपमुख्यमंत्री आणि कणखर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनाने कोकणातील आंबा बागायतदारांनी एक खंबीर पाठीराखा गमावला आहे. गेल्यावर्षी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मुंबईत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत अजित पवार यांनी आंबा बागायतदारांची घेतलेली बाजू आणि दिलेले आदेश आजही बागायतदारांच्या स्मरणात आहेत, अशा भावना प्रसिद्ध आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केल्या.
प्रसन्न पेठे यांनी सांगितले, गेल्यावर्षी आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत सहा खात्यांच्या सचिवांची एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी बँकांनी ‘करारावर घेतलेल्या बागांवर’ पतपुरवठा करण्यास अचानक नकार दिला होता. यामुळे बागायतदार मोठ्या संकटात सापडले होते. ही बाब अजित पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी अत्यंत रोखठोक भूमिका घेतली. बागायतदारांचा ट्रेंड पाहून अचानक फंडिंग बंद करणे योग्य नाही, ते तातडीने सुरू करा, असे आदेश अजित पवार यांनी बँकांना दिले होते. याच बैठकीत २०१५ सालापासून प्रलंबित असलेल्या व्याज परताव्याच्या विषयावरही अजित पवार यांनी निर्णय घेतला होता. कोकणातील व्याज परताव्याची रक्कम ६ ते ७ कोटींच्या आसपास होती. एवढ्या छोट्या निधीसाठी कोकणी शेतकऱ्यांचा विषय का अडवता? असा सवाल अजित पवार यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केला. कोकणातील शेतकरी कधीच काही मागणी करत नाही, त्यामुळे यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या आणि निधी द्या. त्यासाठी शासन निर्णयात काही बदल करावयाचा असेल तर तसे मला सांगा. तसेच परताव्याची रक्कम पालकमंत्री उदय सामंत सांगतील, त्याप्रमाणे करून द्या, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली होती.
आंबा लागवडीबाबत आणि पीक विम्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले होते की, कलमांची लागवड दरवर्षी होत नाही, त्यामुळे नियम बदलून शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी आणि बँकांसमोर बागायतदारांची बाजू मांडताना अजित पवार यांनी जी रोखठोक भूमिका घेतली, ती आजच्या काळात दुर्मिळ आहे. आंबा बागायतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक नेता आज आपल्यातून निघून गेला आहे, असे पेठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com