तब्बल ९६ नवे चेहरे रिंगणात

तब्बल ९६ नवे चेहरे रिंगणात

Published on

swt2828.jpg
20556
सुमेधा पाताडे
swt2829.jpg

समिधा नाईक
swt2830.jpg

संजय पडते
swt2831.jpg

संदेश सावंत
swt2832.jpg

दीपलक्ष्मी पडते

तब्बल ९६ नवे चेहरे रिंगणात
जिल्हा परिषद ः अध्यक्षपद भूषविलेले पाच जण स्पर्धेत
विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले पाच जण निवडणूक मैदानात उतरले आहेत. उपाध्यक्ष पदाचा सभापती पद भूषविलेले सात जण निवडणूक रिंगणात आहेत तर यापूर्वी सदस्य म्हणून काम केलेले सहा उमेदवार पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. अशाप्रकारे १८ जण पुन्हा जिल्हा परिषदेत येण्यासाठी निवडणूक रणांगणात उतरले आहेत तर ९६ नवीन चेहरे आपले नशीब आजमावत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी ५ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ५० पैकी ८ मतदार संघात प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने येथील उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता केवळ ४२ जिल्हा परिषद गटातील सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. या ४२ जागांसाठी ११५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची जिल्ह्याची सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्था असते. ग्रामीण विकासाचे नियोजन, दिशा जिल्हा परिषद ठरवते. जिल्हा परिषद स्वनिधी, जिल्हा नियोजन मंडळ निधी तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त होणारा थेट निधी याचे नियोजन, वाटप जिल्हा परिषद करीत असते. त्यामुळे या स्थानिक स्वराज संस्थेत सदस्य, पदाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा बहुसंख्य राजकीय पुढाऱ्यांची असते. त्यामुळे या निवडणुकी रंगतदार होतात. उमेदवारी मिळविण्यापासून ते निवडून येईपर्यंत जोरदार रस्सीखेच असते. अनेकांना मतदारसंघ आरक्षण पोषक नसल्याने पुन्हा पुन्हा सदस्य होण्याची संधी गमवावी लागते. परंतु, जुन्याची संधी आरक्षणाने काढून घेतल्याने अनेक नवीन चेहरे ती जागा घेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत १९ चेहरे यापूर्वी एकवेळ, दोनवेळ किंवा तीनवेळ सदस्य म्हणून काम केलेले रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेले सुमेधा पाताडे सुकळवाडमधून शिवसेनेकडून, संजय पडते नेरूर देऊळवाडा येथून शिवसेनेकडून, समिधा नाईक आडेलीमधून भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून, संदेश सावंत नाटळमधून भाजपकडून आणि दीपलक्ष्मी पडते आंब्रडमधून शिवसेनेकडून निवडणूक लढवित आहेत. हे पाच चेहरे पुन्हा निवडणूक रिंगणात असून आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत.
याशिवाय उपाध्यक्ष म्हणून काम केलेले राजेंद्र म्हापसेकर माटणे गटातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. यापूर्वी विषय समिती सभापती म्हणून काम केलेले संजय बोबडी पुरळमधून भाजपकडून, संतोष साटविलकर पेंडुरमधून शिवसेनेकडून, प्रितेश राऊळ रेडी गटातून भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. तसेच शर्वाणी गांवकर या आरोंदामधून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. याशिवाय सावी लोके किंजवडेमधून भाजपकडून, प्रमोद कामत बांदामधून भाजपकडून बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले सहा सदस्य पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. यात सदानंद हळदिवे शिवसेनेकडून फोंडा गटातून, मायकल डिसोझा अपक्ष म्हणून कोलगावमधून, जान्हवी सावंत ओरोस बुद्रुकमधून ठाकरे शिवसेनेकडून, अमरसेन सावंत पावशीमधून ठाकरे शिवसेनेकडून, रमाकांत ताम्हाणेकर माणगाव गटातून ठाकरे शिवसेनेकडून, सोनाली घाडीगावकर आडवली मालडी मतदारसंघातून शिवसेनेकडून पुन्हा नशीब आजमावत आहेत.
--------------
चौकट
तिसऱ्या इनिंगसाठी चौघेजण सज्ज
यातील यापूर्वी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या सुमेधा पाताडे दोन वेळा निवडून आलेल्या आहेत. तसेच माजी अध्यक्ष संजय पडते आणि संदेश सावंत यापूर्वी दोन वेळा निवडून आलेले आहेत. तसेच सदस्य म्हणून अमरसेन सावंत दोन वेळा निवडून आलेले होते. आता हे तीन माजी अध्यक्ष आणि एक माजी सदस्य तिसऱ्या इनिंगसाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
------------
चौकट
किमान ३२ चेहरे नवीन दिसणार
जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १८ उमेदवार हे यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बसलेले आहेत. परंतु, अन्य ९६ उमेदवार यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य झालेले नाहीत. यापूर्वी सदस्य म्हणून काम केलेले १८ सदस्य जरी निवडून आले तरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात किमान ३२ चेहरे नवीन येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात नवीन चेहऱ्यांचेच वर्चस्व दिसणार आहे.
-------------

Marathi News Esakal
www.esakal.com