- कोकणवासीयांचे जलप्रवासाचे स्वप्न लांबणीवर

- कोकणवासीयांचे जलप्रवासाचे स्वप्न लांबणीवर

Published on

- rat२९p२६.jpg-
P२६O२०६७४
‘एमटूएम प्रिन्सेस’चे संग्रहित छायाचित्र.
----
कोकणवासियांचे जलप्रवासाचे स्वप्न लांबणीवर
‘रो-रो सेवे’ची चाचणी यशस्वी; सुरक्षेच्या निकषाबरोबर परवानगीचा पेच कायम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः कोकणवासियांना ३८ वर्षानंतर जलप्रवासाचे स्वप्न दाखवणाऱ्या रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वी होऊनही हा प्रकल्प सध्यातरी प्रलंबितच आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा ‘एमटूएम प्रिन्सेस’ या बोटीची यशस्वी चाचणीही झाली होती. मागील वर्षी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणकरांना यामधून प्रवास करता यावा यासाठी नियोजन सुरू होते; मात्र त्यात यश आले नाही. तांत्रिक परवानग्या आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प थांबल्याचे चित्र आहे.
मुंबई ते गोवा जलमार्गावर १९८८ पर्यंत जलवाहतूक सुरू होती. त्यानंतर अनेक दशके हा मार्ग बंद राहिला. राज्याचे बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांच्या पुढाकाराने ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. विजयदुर्ग येथे नवीन जेटीचे काम पूर्ण झाले असून, बोटीची चाचणीही झाली; मात्र, ही सेवा प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी तब्बल १४७ विविध प्रकारच्या परवानग्यांची आवश्यकता असते. या परवानग्या अंतिम मंजुरीत असल्याचे समजते. १५ जुलै १९४७ रोजी झालेल्या ‘रामदास’ बोट दुर्घटनेच्या कटू आठवणींमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत कळीचा बनला आहे. सध्या या बोटीच्या समुद्र तपासण्या, सुरक्षा आराखडे आणि स्टॅबिलिटी रिपोर्ट यांवर काम सुरू आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत डीजी शिपिंगकडून हिरवा कंदील मिळणे कठीण आहे.
हा प्रकल्प केवळ प्रवाशांसाठी सुखकर असून, चालणार नाही तर तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा असणेही तितकेच गरजेचे आहे. तिकीटदर आणि बोटीचा देखभाल खर्च यांचा ताळमेळ बसवणे हे गुंतवणूकदारांसमोर मोठे आव्हान आहे. सध्या प्रस्तावित असलेले तिकीटदर (२५०० ते ९ हजार रुपये) आणि वाहनांचे दर (१ हजार ते १३ हजार रु.) हे सर्वसामान्यांच्या खिशाला किती परवडतील याबाबतही चर्चा सुरू आहे.
-------
चौकट
कोकणवासीयांचे स्वप्न अधुरेच
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि कोकण रेल्वेतील तुडुंब गर्दी यामुळे चाकरमान्यांना जलवाहतुकीची मोठी आशा होती. रो-रो बोटीमुळे मुंबईहून रत्नागिरी तीन तासांत तर सिंधुदुर्ग सहा तासांत गाठणे शक्य होणार आहे; मात्र, जर ही सेवा नियमित सुरू झाली नाही तर पर्यटनाला चालना मिळण्याचे स्वप्न अधुरेच राहू शकते. विजयदुर्गसोबतच भविष्यात मालवण आणि वेंगुर्ले येथेही जेटी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असले तरी, सध्याच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे प्रकल्प कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-----
कोट
परवानग्यांचा हा पेच सुटून आर्थिक गणिते जुळली तरच कोकणच्या जलप्रवासाला खऱ्या अर्थाने ‘सिग्नल’ मिळेल. तोपर्यंत कोकणवास्यांना आणि पर्यटकांना जलप्रवासाच्या आनंदासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हे करत असताना प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असून, त्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे.

- ॲड. विलास पाटणे, रत्नागिरी

Marathi News Esakal
www.esakal.com