गोव्यात नोकरी करणाऱ्या मतदारांचे काय ?
20699
गोव्यात नोकरी करणाऱ्या मतदारांचे काय ?
समन्वयाची गरज ः कामाच्या वेळेत सवलत मिळणार का ?
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या ५ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मात्र, या निवडणुकीत सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील हजारो मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागण्याची भीती सतावत आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा राज्यात नोकरीनिमित्त कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानादिवशी कामाच्या तासांत सवलत मिळावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी गोवा सरकारशी समन्वय साधावा, अशी मागणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील, विशेषतः दक्षिण पट्ट्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांतील बहुसंख्य तरुण-तरुणी रोजगारासाठी शेजारील गोवा राज्यावर अवलंबून आहेत. येथील अनेक नोकरदार दररोज गोवा-सिंधुदुर्ग असा प्रवास करून आपली कर्तव्ये पार पाडतात. मात्र, निवडणुकीच्या काळात याच मतदारांची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मतदान प्रक्रिया सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत चालते. गोव्यात नोकरीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी सकाळी ७ वाजेपूर्वीच घर सोडावे लागते, ज्यामुळे त्यांना सकाळी मतदान करता येत नाही. तर दुसरीकडे, कामावरून परतताना सायंकाळी साडेपाचची वेळ उलटून जात असल्याने त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. नोकरी गमावण्याच्या भीतीपोटी किंवा सुट्टी न मिळाल्यामुळे अनेक मतदार लोकशाहीच्या या उत्सवापासून लांब राहतात.
गोवा सरकार आणि तिथल्या खाजगी कंपन्यांनी मतदानाच्या दिवशी सिंधुदुर्गातील कर्मचाऱ्यांना किमान दोन ते तीन तासांची सवलत द्यावी किंवा कामाच्या वेळेत बदल करावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पत्रव्यवहार करावा, अशी आग्रही मागणी केली आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून गोवा सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवला, तर मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढेल. प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता येणे हे सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, असे आवाहन उमेदवारांनी केले आहे. यावर आता जिल्हा प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
...मग आम्हाला सवलत का नाही?
सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार घरोघरी जात असताना, मतदारांनी आपली ही मुख्य अडचण त्यांच्यासमोर बोलून दाखवली आहे. ‘‘आम्हाला मतदान करण्याची इच्छा आहे, पण नोकरीचे काय?’’ असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे. गोवा सरकार स्वतःच्या राज्यातील निवडणुकीवेळी तेथील कर्मचाऱ्यांना हक्काची सुट्टी किंवा सवलत देते, मग महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी गोव्यातील आस्थापनांनी अशी सवलत का देऊ नये, असा सूर उमटत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी तिन्ही तालुक्यातील उमेदवारांनी आता सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

