जिल्ह्यात ७६९ अतिसंवेदनशील भागात विशेष सर्वेक्षण

जिल्ह्यात ७६९ अतिसंवेदनशील भागात विशेष सर्वेक्षण

Published on

अतिसंवेदनशील भागात विशेष सर्वेक्षण
कुष्ठरोग मुक्तीसाठी प्रशासन सज्ज; ‘स्पर्श’, ‘कुसुम’ मोहीम सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘कुष्ठरोग निवारण दिना’चे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत ‘स्पर्श’ जनजागृती अभियान आणि ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) ही विशेष मोहीम राबवून संसर्गाची साखळी तोडण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. यामध्ये ७६९ अतिसंवेदनशील भागात ४७४ पथकांद्वारे विशेष सर्वेक्षण केले जात आहे.
यंदाच्या ‘स्पर्श’ अभियानाचे घोषवाक्य ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया,’ असे आहे. कुष्ठरोगाविषयी समाजात आजही असलेले गैरसमज, भीती आणि रुग्णांवरील सामाजिक कलंक दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट आणि बाजारपेठांमध्ये विविध स्पर्धा, पथनाट्ये, प्रभातफेऱ्या आणि आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी दिली.
‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ हे शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी ‘कुसुम’ मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. या अंतर्गत नियमित सर्वेक्षणातून सुटणाऱ्या स्थलांतरित कामगार, चिरेखाण मजूर, बांधकाम कामगार, कारागृहातील कैदी, आश्रमशाळांचे विद्यार्थी आणि आंबाबागेतील मजुरांची विशेष तपासणी केली जाईल. जिल्ह्यातील ७६९ अतिसंवेदनशील भागांमधील सुमारे १९ हजार ३५६ नागरिकांची तपासणी करण्यासाठी ४७४ पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये ‘आशा’ स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांचा समावेश आहे.
संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधोपचार (केमोप्रोफायलॅक्सिस) देण्यात येणार आहेत. या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून रत्नागिरी जिल्हा कुष्ठमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.
-----
ही आहेत लक्षणे
कुष्ठरोगाची लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. शरीरावर संवेदना नसलेला फिकट किंवा लालसर चट्टा, तेलकट त्वचा, कानाच्या पाळीवर गाठी येणे किंवा हातपायांत अशक्तपणा जाणवणे, ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. लवकर निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि संभाव्य अपंगत्व टाळता येते.
-----
तालुकानिहाय संवेदनशील गावे
तालुका* संवेदनशील ठिकाणे
चिपळूण* ७४
दापोली* १०६
गुहागर* ६०
खेड* ७०
लांजा* ४१
मंडणगड* ४०
राजापूर* ५५
रत्नागिरी* २७४
संगमेश्वर* ४९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com