पावस गटात दोन शिवसेनेमध्ये निर्णायक लढत

पावस गटात दोन शिवसेनेमध्ये निर्णायक लढत

Published on

जिल्हा परिषद निवडणूक --लोगो

पावस गटात दोन शिवसेनेमध्ये निर्णायक लढत
भाजपची भूमिका ठरणार कळीचा मुद्दा; दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार, लढतीकडे सर्वांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० ः स्व. कुसुमताई अभ्यंकर यांच्या आमदारपदाच्या कारकिर्दीपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला पावस जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी न मिळाल्यामुळे या गटांमध्ये ठाकरे शिवसेना विरूद्ध शिंदे शिवसेना अशी रंगतदार लढत होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते शेवटपर्यंत कोणाच्या बाजूने राहणार, यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत.
पावस जिल्हा परिषद गट पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला आहे, हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने दाखवून दिले आहे. त्यानंतर शिवसेनेची युती झाल्यानंतर हा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला; परंतु स्थानिक पातळीवर मतभेद असल्याने कालांतराने दोन्ही पक्षांमध्ये कागदोपत्री युती होती. त्या वेळी भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले; परंतु त्यानंतर आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट व शिंदेगट असे शिवसेनेचे विभाजन झाले. यामध्ये अनेकांनी शिंदेगटामध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदेगटाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे या जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिंदेगटाने आपले प्राबल्य मिळवले. यामध्ये भाजपची काही प्रमाणात घसरण झाली; मात्र पक्षाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती झाल्यामुळे शिंदेगट व भाजप यांनी आपल्यातील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून पक्षाचे काम केल्यामुळे दोन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून महायुती झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुतीचे वाटप झाले; मात्र रत्नागिरी तालुक्यामध्ये बालेकिल्ला असलेल्या पावसमध्ये भाजपला उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती; परंतु वरिष्ठ पातळीवरून समजूत घातल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेगटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आणि अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून प्रचाराला सुरुवात झाली आहे. भविष्यातील या गटातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती करण्यात आली असून, प्रचारयंत्रणा राबवली जात आहे. विकासकामांवर ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. पावस गटात महायुतीचे ॲड. महेंद्र मांडवकर हे उमेदवार आहेत. ठाकरे गटाचे पावस विभागप्रमुख रवीकिरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे शिवसेनेकडून प्रचार सुरू आहे.
-----------
कोट
गेली पंधरा वर्षे विभागप्रमुख म्हणून तोडणकर सातत्याने या गटामध्ये विकासकामे, विविध उपक्रम, अनेक गरजूंना मदत अशा उपक्रमातून घरापर्यंत पोहोचले आहेत. अनेकजण पक्ष सोडून गेले तरी निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्ते आजही जागेवर असल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे.
--उदयराज भाटकर, माजी शाखाप्रमुख, ठाकरे शिवसेना
---
कोट
आम्ही लोकसभा व विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढताना अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे केंद्रात व राज्यात सत्तेत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे वर्चस्व राहावे यासाठी या गटांमध्ये आमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तरी आम्ही हातात हात घालून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहोत.
--संतोष सुर्वे, कार्यकर्ता, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com