मालवण-डिकवल-कट्टा बस अचानक रद्द

मालवण-डिकवल-कट्टा बस अचानक रद्द

Published on

मालवण-डिकवल-कट्टा बस अचानक रद्द

विद्यार्थ्यांची गैरसोय ः प्रजासत्ताक दिनीच प्रकार घडल्याने तीव्र संताप

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३०: येथील आगाराच्या नियोजित बस फेऱ्या वारंवार आणि कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्या जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रजासत्ताक दिनी आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसांत मालवण-मोगरणे-तिरवडे-डिकवल मार्गे कट्टा येथे येणारी बस फेरी अचानक बंद ठेवण्यात आल्याने वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. या प्रकाराबाबत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि शाळा व्यवस्थापनाने आगार व्यवस्थापकांकडे तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली सकाळची बस फेरी मालवण आगाराने अचानक रद्द केली. यामुळे मोगरणे, तिरवडे, गोळवण, डिकवल या भागातील विद्यार्थी शाळेतील ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. एका राष्ट्रीय सणादिवशी बस सेवा बंद ठेवल्याने शाळेच्या उपस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला. याबद्दल मुख्याध्यापक देवयानी गावडे यांनी निवेदनाद्वारे मालवण आगार व्यवस्थापकांकडे लेखी नाराजी नोंदवली आहे.
यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्येही सायंकाळच्या सत्रात बस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थ्यांनी हाल सोसले होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर व पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेतल्यावर सेवा काही काळ सुरळीत झाली होती. मात्र, आता पुन्हा तोच प्रकार सुरू झाला आहे. शाळेने लेखी तक्रार देऊनही गेल्या दोन दिवसांत पुन्हा हीच बस फेरी अचानक बंद करण्यात आली, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राष्ट्रीय सणादिवशी आणि परीक्षेच्या काळात बस बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून ही सेवा तातडीने नियमित करावी, अन्यथा तीव्र पाऊले उचलली जातील असेही कट्टा शाळा व्यवस्थापन समितीने म्हटले आहे.
-----------------
कारभारात सुधारणा करा
शाळा व्यवस्थापनाने राष्ट्रीय सण, परीक्षा आणि शालेय कामकाजाच्या दिवसांत बस सेवा कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये. तांत्रिक कारणास्तव बस बंद ठेवायची असल्यास किमान एक दिवस आधी शाळेला त्याची कल्पना द्यावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मालवण आगाराने आपल्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com