अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही
21306
अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही
मान्यवरांच्या भावना; सावंतवाडीत सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक उमदे आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. त्यांनी तळागाळातील लोकांचा विचार करून विकासात मोठे योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशा शब्दांत सावंतवाडीतील सर्वपक्षीय मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
येथे आयोजित या श्रद्धांजली सभेत विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अजितदादांच्या कामाच्या पद्धतीचा आणि त्यांच्या आश्वासक नेतृत्वाचा गौरव केला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, अजय गोंदावळे, विनोद सावंत, साक्षी वंजारी, गुरू मठकर, सदा कदम, उमाकांत वारंग, पुंडलिक दळवी, परीक्षित मांजरेकर, पूनम नाईक, हिदायतुल्ला खान, नगरसेवक देवेंद्र टेमकर, रवींद्र म्हापसेकर, ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, शफीक खान, मंगलदास देसाई, समीर वंजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. भोसले यांनी, मला अजितदादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ते कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देत. भेटायला येणाऱ्यांचे स्वतः आदरातिथ्य करत. दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना विकासकामांसाठी निधी देण्यात दादांनी मोठा पुढाकार घेतला होता, असे सांगितले. संजू परब यांनी, अजितदादा ''बोले तैसा चाले'' या वृत्तीचे नेते होते, असे सांगून त्यांच्या कामाच्या वेगाचे कौतुक केले. श्री. साळगावकर यांनी दादांच्या ''जनता दरबारा''च्या आठवणी सांगितल्या. व्हिक्टर डॉन्टस यांनी दादांनी जनसेवा आणि रोजगाराची गंगा कशी निर्माण केली, यावर प्रकाश टाकला. रुपेश राऊळ यांनी त्यांच्या प्रशासकीय अभ्यासाचा उल्लेख करून त्यांच्या सतर्कतेचे कौतुक केले. यावेळी साक्षी वंजारी, शर्वरी धारगळकर, अजय गोंदावळे, ॲड. दिलीप नार्वेकर, पुंडलिक दळवी, उमाकांत वारंग यांनीही भावना व्यक्त केल्या. सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी मौन पाळून आदरांजली वाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

