साहित्य संमेलनांची सातत्याने गरज
21371
साहित्य संमेलनांची सातत्याने गरज
डॉ. निर्मोही फडके : कणकवलीत साहित्य संगीत संमेलन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ : समाजात सध्या विकृती आणि विषारी वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम प्रत्येकाच्या मनावर होत आहे. या विषारी वातावरणाचे विष उतरविण्याचे प्रभावी औषध म्हणजे साहित्य आणि संगीत होय, असे प्रतिपादन साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षा तसेच साहित्य अभ्यासक व संगीत संशोधक डॉ. निर्मोही फडके यांनी केले.
साहित्य संगीत मित्रमंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली येथील मराठा मंडळाच्या सभागृहात दुसरे साहित्य संगीत संमेलन झाले. याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.फडके बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, कवी व साहित्यिक अजय कांडर, सेवानिवृत्त अधिकारी हरि चव्हाण, स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात हरी चव्हाण, अजय कांडर आणि संध्या तांबे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविकात सुभाष भंडारे यांनी संमेलनामागील उद्देश स्पष्ट केला. महेंद्र चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेला ‘मैत्र पुरस्कार’ लेखक संजय तांबे यांना, तर ‘मैत्र संगीत पुरस्कार’ श्याम तेंडोलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी श्याम तेंडोलकर यांच्या संगीत मैफलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
सहानुभूतीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत!
डॉ. फडके म्हणाल्या, की ‘‘संगीत आणि साहित्यामधून सहानुभूतीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत, विशाल जीवनातील सर्व सुख-दुःखांचा प्रत्यय आला पाहिजे. प्रत्येकाचे मन अंतर्मुख होऊन विचार करू लागले पाहिजे, प्रत्येकाच्या मनातील जाणिव प्रगल्भतेने व्यक्त व्हायला हव्यात. त्यासाठी अशी साहित्य संमेलने सातत्याने होणे आवश्यक आहे. झेन झी पिढी सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे. चांगल्या साहित्य आणि संगीताच्या प्रचार प्रसारासाठी ही माध्यमे देखील महत्वाची आहेत.’’
--
समाजाचेही पाठबळ आवश्यक
‘‘डॉ. फडके म्हणाल्या, की ‘‘वय वर्ष ६ ते १६ वयोगटातील मुलांची बौद्धिक वाढ झपाट्याने होत असल्याने या वयोगटात वाचन, लेखन आणि मातृभाषेतील संवादाचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरम्यान, साहित्य आणि संगीत हे सर्व कलांचे आत्मा असून हा एक सतत प्रवाही प्रवास आहे. समाजप्रबोधन हे साहित्यिकांचे कर्तव्य असले तरी समाजानेही त्यांच्या कार्याला पाठबळ दिले पाहिजे,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

