रत्नागिरी ः बॉण्डमधील अटी मोडल्याने तरूणाची रवानगी  तुरुंगात

रत्नागिरी ः बॉण्डमधील अटी मोडल्याने तरूणाची रवानगी तुरुंगात

Published on

बॉण्डमधील अटी मोडल्याने
तरुणाची रवानगी तुरुंगात

दंड न भरल्याने अपर पोलिस अधीक्षक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : शहर पोलिस ठाण्याने दाखल केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणातील अटींचे उल्लंघन करणे एका तरुणाला महागात पडले आहे. बंधपत्रातील (बॉण्ड) अटी मोडून दंडाची रक्कम न भरल्याबद्दल एका तरुणाला दिवाणी तुरुंगात ठेवण्याचे आदेश अपर पोलिस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी जयदत्त (बी. बी.) महामुनी यांनी दिले आहेत. त्यानुसार त्याची रवानगी जिल्हा विशेष कारागृहात करण्यात आली आहे.
साहिल समीर सोलकर (वय २६, रा. झाडगाव, शेट्ये नगर) असे कारवाई झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलिसांनी साहिल सोलकर याच्याविरुद्ध ‘बीएनएसएस’अन्वये ‘चॅप्टर केस’चा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सुनावणीदरम्यान त्याने बंधपत्र उल्लंघनाची दंडनीय रक्कम भरण्याची तयारी दर्शवली होती. त्याची विनंती मान्य करून ही रक्कम २५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये इतकी कमी करण्यात आली होती.
दंडाची रक्कम भरण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२५ पासून १९ जानेवारी २०२६ पर्यंत वारंवार संधी आणि मुदत देऊनही साहिलने रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. त्याचा जामीनदारही दिवाळखोरीमुळे रक्कम भरण्यास असमर्थ असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिसांनी त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी वॉरंट काढले. मात्र, ३० जानेवारीच्या अहवालानुसार त्याच्या नावावर कोणतीही जप्तीयोग्य मालमत्ता मिळून आली नाही. सुनावणीसाठी १० वेळा बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५ वेळा साहिल गैरहजर राहिला. त्याने ना दंडाची रक्कम भरली, ना नोटिसीला उत्तर दिले. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी त्याला बंधपत्रातील उर्वरित कालावधी म्हणजेच ३ जुलै २०२६ पर्यंत किंवा त्याने दंड भरून नवीन जामीनदार सादर करेपर्यंत दिवाणी तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, रत्नागिरी पोलिस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही अधिक कठोरपणे राबवल्या जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com