काजू, कोको मिशनचा कोकणवासीयांना लाभ
‘काजू, कोको मिशन’चा कोकणवासीयांना लाभ
निधीची तरतूद; मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाची आशा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : भारतीय काजूला जागतिक स्तरावर ‘प्रीमियम ब्रँड’ बनवण्यासाठी जाहीर झालेला ‘समर्पित काजू कार्यक्रम’ आणि ‘कोको मिशन’साठीची केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचा लाभ कोकणातील उत्पादकांना होणार आहे. त्याचबरोबर क्षेत्र विस्ताराला चालना मिळणार आहे. तसेच मच्छीमारांना दिलेली सीमाशुल्क सवलतीसह रखडलेले महामार्गांच्या पूर्णत्वासाठी मे २०२६ पर्यंत उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामुळे ‘मुंबई-गोवा’ महामार्ग पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अर्थसंकल्पातील ही कोकणसाठी जमेची बाजू ठरणार आहे.
काजू उद्योगाचे ‘ब्रँडिंग’ आणि आधुनिकीकरणातून कोकणातील काजू उद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पाऊल उचलले आहे. ‘समर्पित काजू कार्यक्रम’अंतर्गत भारतीय काजूला २०३० पर्यंत ग्लोबल ब्रँड बनवण्याचे लक्ष्य आहे. ‘अपेडा’द्वारे काजू प्रक्रिया उद्योगातील यंत्रसामग्रीच्या आधुनिकीकरणासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसेच, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे विशेष ‘काजू प्रक्रिया क्लस्टर्स’ विकसित केले जाणार असून, तेथे सामायिक सुविधा केंद्रांचा लाभ लघु उद्योजकांना घेता येईल. कोकणात मोठ्याप्रमाणात काजू उद्योजक आहेत, त्यांना प्रक्रिया उद्योग सुरू करणे शक्य होईल.
तसेच केंद्र शासनाच्या ‘कोको मिशन’चा लाभ कोकणातील नारळ बागायतदारांसह प्रक्रिया उद्योग करणाऱ्यांना होईल. यामध्ये नारळाच्या जुन्या झाडांच्या जागी नवीन संकरित जातींची लागवड करण्यासाठीही भर दिला आहे. किनारपट्टी भागातील नारळ आणि काजू यासारख्या उच्च मूल्य असलेल्या पिकांच्या लागवडीसाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत दिली जाणार असल्याने भविष्यात क्षेत्र विस्ताराला मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, महामार्ग आणि रेल्वेचे जाळे दळणवळणाच्या क्षेत्रातही झालेल्या तरतुदीमुळे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होण्याची आशा आहे.
------
कोट १
समर्पित काजू कार्यक्रमामुळे कोकणातील प्रक्रिया उद्योजकांना मोठे आर्थिक बळ मिळणार आहे. प्रक्रिय उद्योग ऊर्जितावस्थेत आल्यामुळे काजू लागवडीला चालना मिळेल. त्याचबरोबर कोकणात रोजगार मोठ्याप्रमाणात निर्माण होईल. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी स्वागतार्ह आहे.
- डॉ. शैलेश शिंदे-देसाई, काजू उत्पादक
----
कोट २
काजू आणि कोको मिशन हे निर्यातीला चालना देणारे आहे. जिथे उत्पादन होते, तिथे प्रक्रिया उद्योग असेल तर त्याचा फायदा स्थानिकांना होईल. तसेच, दोन्हींच्या क्षेत्र वाढीला फायदा होणार आहे. या योजनांचे आराखड्याप्रमाणे नियोजन आणि अंमलबाजवणी झाली तर, त्याचा लाभ निश्चितच कोकणवासीयांना होईल.
- डॉ. किरण मालशे, भाट्ये नारळ संशोधन केंद्र
-----
कोट ३
कौशल्य विकास, लघु व मध्यम उद्योग याविषयी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींनी योग्य पद्धतीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
- उदय बोडस, अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

