लांजा- लांजा नगरपंचायत कुवे, पुरा गावाचे नुकसानच
rat2p29.jpg-
21639
लांजा ः नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांना निवेदन देताना कुवे ग्रामस्थ.
-------
लांजा नगरपंचायतीतून कुवे, पुरा वगळावे
ग्रामस्थांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; घरपट्टीसह विविध करांच्या वाढीने त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २ ः नगरपंचायत हद्दीतून कुवे आणि पुरा ही गावे वगळावीत यासाठी कुवे ग्रामस्थांनी नगरपंचायतीवर धडक दिली. नगरपंचायतीत सहभागी झाल्यापासून कुवे ग्रामस्थांचे नुकसानच अधिक होत आहे. घरपट्टी, विविध कर आदींमध्ये होणारी वाढ ग्रामस्थांना न परवडणारी आहे. त्यामुळे ही गावे वगळण्याबाबत ग्रामस्थांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन दिले.
लांजा नगरपंचायतीत सामील झाल्यापासून लांजातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. कुवे गावच्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक निर्णय लांजा शहराला डोळ्यांसमोर ठेवून होत असल्याने कुवे गावच्या फायद्याचे नसतानाही ते निर्णय ग्रामस्थांना स्वीकारावे लागत आहेत. घरपट्टी, मालमत्ता कर, खेळ, स्वच्छता कर किंवा आणखी काही नवीन कर लादले जात आहेत किंवा आहे त्या दरामध्ये चौपट वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे घर किंवा अन्य काहीही प्रकारचे बांधकाम करत असताना नगरपंचायतीच्या नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय बांधकाम करता येत नाही. त्यामुळे नवीन बांधकाम करणे आम्हाला अवघड झाले आहे. तोच प्रकार घर दुरुस्तीच्या बाबतीतही होत आहे. नगरपंचायतीच्या विकास आराखड्यात मैदान, बागा, शैक्षणिक व अन्य काही कामांसाठी नियमाप्रमाणे लांजापेक्षा अधिक भूखंड हे कुवे गावात आरक्षित करून व गावच्या माथ्यावर मारून आमच्या जमिनी अडकवून ठेवल्या जात आहेत. नगरपंचायतीमुळे येणारा जास्त नियोजित वाटा लांजा शहराला जास्त आणि कुवेला कमी प्रमाणात येत आहे. खर्च करताना, निर्णय करताना कुवे गावचा विचार केला जात नाही.
या सर्व एकूण बाबी लक्षात घेता कुवे आणि पुरा गावाला नगरपंचायतीमधून वगळण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन मुख्याधिकारी अभिजित कुंभार तसेच नगराध्यक्ष सावली कुरूप यांना देण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर व नगरसेवक उपस्थित होते.
चौकट
रोजगार हमीपासून वंचित
कुवे गावातील ८० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे; मात्र नगरपंचायतीत सहभागी झाल्यापासून रोजगार हमीच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजनेपासून मागील १४ वर्षांपासून गावाला वंचित राहावे लागत आहे. परिणामी, गोरगरीब शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कुवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रापेक्षा सध्याचे नगरपंचायत कार्यक्षेत्र गावापासून पाच किमी लांब अंतरावर आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणीच्या कामासाठी लांजा येथे येणे-जाणे गैरसोयीचे ठरते.
चौकट
पडताळणी करून निर्णय घेणार ः मुख्याधिकारी कुंभार
दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी कुवे ग्रामस्थांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

