अद्याप एकही माकडताप रुग्ण नाही
21766
अद्याप एकही माकडताप रुग्ण नाही
प्रशासनाकडून आढावा; संवेदनशील क्षेत्रात अधिक सतर्कता
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः जिल्ह्यात यावर्षी अद्याप एकही माकडताप रुग्ण आढळलेला नाही. गतवर्षी चार रुग्ण आढळले होते. यावर्षी रुग्ण आढळला नसला तरी या आजाराचा कालावधी सुरू झाला आहे. त्यामुळे जोखीमग्रस्त भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी माकडताप आढावा बैठकीत केले.
माकडताप (कॅसनूर फॉरेस्ट डिसीज) व हत्तीरोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत जिल्हा टास्क फोर्सची सभा आज जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. बिलोलीकर तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामपंचाय विभाग व वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश करतस्कर यांनी विस्तृत सादरीकरण केले. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यांमध्ये माकड तापाचे रुग्ण आढळून येतात. यावर्षी अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मागील वर्षी या आजाराचे चार रुग्ण आढळले होते. या अनुषंगाने जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, जनजागृती याबाबत विस्तृत सादरीकरण केले. माकडताप आजार हा सर्वप्रथम माकडांना होऊन माकड मृत होते. मृत माकडाच्या अंगावर असलेल्या दूषित गोचिडींमार्फत या आजाराचा प्रसार माणसांमध्ये होतो. शेती, बागायती, विशेषतः काजू बागांमध्ये गेल्यानंतर अशा दूषित गोचिड मनुष्याला चावल्यास या आजाराचा प्रसार माणसांमध्ये संभवतो. ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकडताप जोखीमग्रस्त नागरिकांनी शेती, बागायतीमध्ये कामासाठी जातेवेळी डीएमपी ऑईल अंगाला लावणे आवश्यक आहे. पूर्ण बाह्याचे शर्ट, पॅन्ट व शूज देखील गोचिडीपासून संरक्षणासाठी वापरणे गरजेचे आहे. बाधित भागातील बागायती, शेतीमधून नागरिकांनी घरी आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करणे गरजेचे आहे, असे यावेळी आवाहन करण्यात आले. दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यांतील यापूर्वी माकडताप रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये घरोघरी या आजाराबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहितीपत्रक देखील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकेंमार्फत वाटले असून जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
..................
हत्तीरोगाबाबत विशेष सतर्कता
हत्तीरोगाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील एक महिन्याच्या कालावधीमध्ये नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार या भागातून कामासाठी आलेले असून त्यांचे ५ हजार ८८४ रक्त नमुने तपासले असता १०१ रक्त नमुन्यांमध्ये मायक्रो फायलेरियाने बाधित आढळले आहेत. त्या सर्व रुग्णांना १२ दिवसांचा समूळ उपचार व सहवासित मजुरांना एक दिवसाचा समूळ औषधोपचार केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हत्तीरोग तपासणीकरिता मालवण येथे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे रात्रीच्या वेळी रुग्णांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येत आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच रेबीज आजाराचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

