‘प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव’ अभियान
‘प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव’ अभियान
जि.प.चा उपक्रम; आंगणेवाडी, कुणकेश्वरमध्ये स्वच्छतेचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त जिल्हा करण्याचा मानस आहे. याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून ९ फेब्रुवारीला आंगणेवाडी यात्रोत्सव, तर १५ ते १७ फेब्रुवारी या कुणकेश्वर यात्रोत्सव कालावधीत ‘प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये यात्रोत्सवात येणारे व्यापारी, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रचार प्रसिद्धी व्हावी, या हेतूने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून शालेय स्तरावर प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा, मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, शाळा व शाळा परिसर स्वच्छता कार्यक्रम, समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंगणेवाडी व कुणकेश्वर हे प्रसिद्ध यात्रोत्सव आहेत. या कार्यक्रमांना लाखो भाविक, व्यापारी हजेरी लावत असतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात जैविक व प्लास्टिक कचरा तयार होत असतो. आंगणेवाडी यात्रोत्सव (९ फेब्रुवारी) व कुणकेश्वर यात्रोत्सवामध्ये (१५ ते १७ फेब्रुवारी) ‘प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मालवण व देवगड यांना दिल्या आहेत. यात्रोत्सव काळात फलक, वर्तमानपत्र, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून व्यापक प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यात्रोत्सव काळात मंदिर व मंदिर परिसरात कचरा कुंड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. हॉटेल व दुकानदारांना जैविक व प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी कचरा कुंड्या किंवा निळ्या व हिरव्या रंगाच्या गारबेज बॅगचा पुरवठा करण्यात येणार आहे. जमा होणारा कचरा त्यांनी एकत्र करून ठेवायचा आहे. यात्रोत्सवाच्या ठिकाणी जैविक कचरा एकत्र करून योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचे कंपोष्ट खड्डे तयार करण्यात येणार आहेत.
यात्रोत्सवात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून स्वच्छता कर व स्वच्छता डिपॉझिट आकारण्यात येणार आहे. स्वच्छता डिपॉझिट व्यापाऱ्याने आपल्याकडील जैविक व प्लास्टिक कचऱ्याचे योग्य नियोजन केल्यास परत दिले जाणार आहे. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून प्लास्टिक बंदी अधिनियमाप्रमाणे व्यापाऱ्याकडे सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास रीतसर दंड आकारण्यात येणार आहे. सिंधुदुर्गवासीय, भाविक व व्यापाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवात ‘प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव’ करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. खेबुडकर यांनी केले आहे.
...................
... तर दंडात्मक कारवाई
आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवात येणाऱ्या व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यायी वस्तूंचा वापर करून सहकार्य करावे. यात्रोत्सवात सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. खेबुडकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

