कणकवलीत ठाकरे शिवसेनेची कसोटी

कणकवलीत ठाकरे शिवसेनेची कसोटी

Published on

22089
कणकवली निवडणूक वार्तापत्र

कणकवलीत ठाकरे शिवसेनेची कसोटी
महायुतीशी थेट लढत : ठाकरे शिवसेच्या वरिष्ठ नेत्‍यांची प्रचाराकडे पाठ
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ : जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गावागावात प्रचाराचा जोर वाढला आहे. तालुक्‍यातील बहुतांश मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुती विरोधात ठाकरे शिवसेना अशी लढत होत आहे. प्रचारात युतीची आघाडी आहे, तर ठाकरे शिवसेनेच्या वरिष्‍ठ नेत्यांची प्रचाराकडे पाठ राहिल्‍याने सेनेच्या उमेदवारांनाच प्रचार धुरा सांभाळावी लागत आहे. दरम्‍यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मागील तीन निवडणुकांत कणकवली तालुक्‍यात शिवसेनेला खाते उघडता आलेले नाही. मागील निवडणुकांप्रमाणेच यंदा देखील महायुतीला टक्‍कर देणारी यंत्रणा ठाकरे शिवसेनेकडे नसल्‍याचे चित्र सध्या तरी प्रचारावरून दिसत आहे.
यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्‍हणजे, कणकवली तालुक्‍यातील जिल्‍हा परिषदेच्या आठ गणांपैकी भाजप आणि शिंदे शिवसेनेचा प्रत्‍येकी एक सदस्य बिनविरोध ठरला आहे. त्‍यामुळे उर्वरित सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. कणकवली पंचायत समितीच्या १६ जागांपैकी तब्‍बल ६ जागांवर भाजपचे सदस्य बिनविरोध ठरले आहेत. त्‍यामुळे उर्वरित १० जागांसाठी २६ जण निवडणूक लढवत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्‍यांची पहिली निवडणूक १९९२ मध्ये झाली होती. या पहिल्‍या निवडणुकीत काँग्रेसने जिल्‍हा परिषदेसह पंचायत समित्यांवर निर्विवाद वर्चस्व राखले होते. नारायण राणे यांचा सिंधुदुर्गच्या राजकारणात प्रवेश झाल्‍यानंतर १९९७ आणि २००२ या दोन निवडणुका शिवसेना-भाजप युतीने जिंकल्‍या. २००५ मध्ये राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्‍यानंतर २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये झालेल्‍या निवडणुकांत जिल्‍हा परिषद, पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा फडकला. आता राणे भाजप पक्षात आहेत. त्‍यामुळे कणकवली तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद गण आणि पंचायत समिती गटामध्ये भाजपचे उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत.
कणकवली तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद गणांमध्ये नाटळ येथून भाजपचे संदेश सावंत आणि ठाकरे सेनेचे उत्तम लोके यांच्यात थेट लढत आहे. कलमठमध्ये भाजपच्या सुप्रिया मेस्त्री आणि ठाकरे सेनेच्या वैदेही गुडेकर यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे. त्‍याचप्रमाणे कळसुली मतदारसंघातही भाजपच्या शीतल दळवी आणि ठाकरे सेनेच्या प्राची आंबडोसकर या उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. फोंडाघाट मतदारसंघात तिरंगी लढत आहे. शिंदे शिवसेनेचे सदानंद हळदिवे, राष्‍ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनंत पिळणकर आणि भाजपचे बंडखोर राजन चिके लढत देत आहेत. या तिघांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असल्‍याने कणकवली तालुक्‍यातील फोंडाघाटमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. कासार्डेमध्ये भाजपचे संतोष पारकर विरोधात ठाकरे सेनेचे हनुमंत म्‍हसकर यांच्यात मुकाबला आहे, तर हरकुळ बुद्रूकमधील लढत भाजपसाठी एकतर्फी आहे. या ठिकाणी भाजपचे मनोज रावराणे आणि शिंदे शिवसेनेचे बंडखोर प्रमोद सांगवेकर लढत देत आहेत.

फोंडाघाटमध्ये पंचरंगी लढत
कणकवली पंचायत समितीमधील ओसरगाव येथे शिंदे शिवसेनेच्या अक्षता राणे आणि ठाकरे सेनेच्या चंदना राणे, कळसुलीमध्ये भाजपचे लक्ष्मण गावडे, ठाकरे सेनेचे मनोहर मालंडकर आणि अपक्ष भालचंद्र दळवी यांच्यात लढत आहे. त्‍याप्रमाणे फोंडाघाट येथे पंचरंगी लढत आहे. येथे भाजपचे पवन भालेकर, ठाकरे सेनेचे चैतन्य सावंत यांच्यासह साईनाथ भोवड, राजेश शिरोडकर आणि सुभाष सावंत हे तीन अपक्ष उमेदवार आहेत.
नरडवेमध्ये भाजपच्या राजश्री पवार आणि ठाकरे शिवसेनेच्या पूजा गावकर यांच्यात थेट लढत आहे. कासार्डेमध्येही भाजपचे सहदेव खाड्ये आणि ठाकरे सेनेचे मयुर पेडणेकर हे प्रचार यंत्रणा राबवत आहेत. कलमठमध्ये भाजपचे गुरुनाथ वर्देकर आणि सामाजिक कार्यकर्ते तथा अपक्ष उमेदवार विनायक मेस्त्री हे मतदारनिहाय गाठीभेटी घेताना दिसून येत आहेत. लोरे नं.१ मध्ये भाजपच्या मानसी मराठे आणि ठाकरे सेनेच्या कीर्ती एकावडे तर तळेरेमध्ये भाजपचे राजेश जाधव आणि काँग्रेसचे प्रवीण वरुणकर यांच्यात थेट लढत होत आहे.

चौकट
खारेपाटणमध्ये तिरंगी तर जानवलीत शांतता
खारेपाटणमध्ये तिरंगी मुकाबला होत असून ठाकरे शिवसेनेचे रामचंद्र राऊत, शिंदे शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे आणि अपक्ष उमेदवार रफिक नाईक हे विजयासाठी जोरदार प्रचार करत आहेत. हरकुळ खुर्दमध्ये तिरंगी लढत आहे. भाजपचे चंद्रहास सावंत, ठाकरे शिवसेनेचे अविनाश सावंत आणि अपक्ष उमेदवार विद्याधर तांबे हे लढत देत असून तिघांनीही घरोघरी प्रचार सुरू ठेवला आहे.
जानवली मतदारसंघात मात्र शांतता आहे. जानवली जिल्‍हा परिषद आणि त्‍याअंतर्गत येणारी जानवली आणि बिडवाडी पंचायत समिती गटांमधील उमेदवार बिनविरोध ठरले. त्‍यामुळे जानवली, बिडवाडी गावामध्ये निवडणुकीचे वातावरण नाही. त्यामुळे येथील कार्यकर्ते अन्य भागांत प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com