कुणकेश्वरला देवस्वाऱ्या वाढण्याची शक्यता

कुणकेश्वरला देवस्वाऱ्या वाढण्याची शक्यता

Published on

swt410.jpg
22071
कुणकेश्‍वर ः येथे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाजूला हेमंत वातकर, उदय पेडणेकर व इतर. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


कुणकेश्वरला देवस्वाऱ्या वाढण्याची शक्यता
महाशिवरात्री दिवशी सायंकाळी ५ पूर्वी दर्शन घेण्याचे भाविकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा येत्या १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. भाविकांसह यात्रेत येणाऱ्या व्यापाऱ्यांनी यात्रा सुरळीत होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री देव कुणकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे. यात्रेत सद्यस्थितीत ५ देवस्वाऱ्या येण्याची नोंद झाली आहे. अजूनही ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याने यात्रेतील दर्शनावर येणारा ताण पाहता महाशिवरात्री दिवशी भाविकांनी सायंकाळी ५ पूर्वी दर्शनाचा लाभ घ्यावा. देवस्वाऱ्यांमुळे दर्शन विस्कळीत होण्याच्या शक्यतेने सायंकाळी ६ नंतर रात्री १२ पर्यंत भाविकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यंदा १५ ते १७ असे तीन दिवस यात्रा होणार आहे. यानिमित्ताने देवस्थानच्यावतीने पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी श्री देव कुणकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, दीपक घाडी, संजय वाळके, संतोष लाड, मंगेश पेडणेकर, व्यवस्थापक रामदास तेजम उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, ‘‘यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये मंडप व्यवस्था, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरिकेटिंग व रेलिंग केले आहे. याकामी स्वतंत्र स्वयंसेवकांचे नियोजन केले आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिरासह यात्रा परिसरात आवश्यक त्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे. तसेच देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्र किनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे. येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणांना तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीस सुमारे १०० विद्यार्थी स्वयंसेवक असणार आहेत. या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव, प्रथमोपचार, बिनतारी संदेश यंत्रणा, पाण्यातील व्यक्ती बचाव पध्दती अशा अनेक बचाव पध्दतीने तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले आहे. तसेच अमावस्या १७ रोजी असल्याने तीर्थस्नानास भाविकांना व देवभेटीकरिता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपूर्ण दिवस लाभ घेता येणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष व महिलांकरिता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असणार आहे. पोलिस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘‘मध्यंतरी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यात्रा नियोजन बैठकीत प्रत्यक्षात कामकाजाची पाहणी करून उणीवा समजून घेण्यात आल्या. संबंधित शासकीय विभागांना अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. वाहतूक, रस्ते, विद्युत, आरोग्य व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, स्वयंसेवक, पाणीपुरवठा आदींचा आढावा घेण्यात आला. भेटीसाठी येणाऱ्या देवस्वाऱ्यांच्या कमिटींनी नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टशी लवकरात लवकर प्रत्यक्ष संपर्क साधावा.’’

चौकट
यात्रा परिसरात हिरकणी कक्ष
यात्रेत विविध ठिकाणच्या ५ देवस्वाऱ्या येणार असून आणखीहीही संख्या वाढू शकते. यात्रा परिसरामध्ये हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येणार असून हा कक्ष कायमस्वरुपी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री. तेली यांनी यावेळी दिली.

चौकट
प्लास्टिक पिशव्यांची विक्री, वापरावर बंदी
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच यात्रा परिसरामध्ये एलईडी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण होणार आहे. यात्रा परिसरामध्ये राजकीय फलक व इतर फलकांपासून असुरक्षितता निर्माण होऊ नये, यासाठीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्याकडून केले आहे. रस्त्यांवर फलकाच्या कमानी उभारण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे पूजाताट विक्रेते व व्यापारी यांना प्लास्टिक पिशव्या विक्री व वापर करण्यास बंदी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com