-बाजी वाघाचा कोयना परिसरात संचार

-बाजी वाघाचा कोयना परिसरात संचार

Published on

वाघाचे चित्र वापरावे

‘बाजी’ वाघाचे कोयना भागात वास्तव्य
व्याघ्रगणना मोहीमेमध्ये कॅमेऱ्यात कैद ; वनविभागाकडून हालचालींवर लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : गेल्या काही काळापासून सह्याद्रीच्या दुर्गम भागात आपला वावर निर्माण करणाऱ्या ‘बाजी’ या नर वाघाने आता कोयना परिसरात आपले साम्राज्य प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्याघ्रगणनेदरम्यान ‘बाजी’चे दर्शन कॅमेऱ्यात ट्रॅप झाले असून, त्याच्या डरकाळीने संपूर्ण सह्याद्रीचा परिसर दुमदुमून गेला आहे. त्यामुळे कोयनेसह चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी, तिवडी, तळसर, पोफळी परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सध्या तीन नर वाघांचा संचार आहे. यातील ‘सेनापती’ आणि ‘सुभेदार’ यांनी चांदोली परिसरात आपली हद्द निश्चित केली आहे तर ‘बाजी’ने कोयना भागातील भैरवगड ते पाली, मालदेव पट्ट्यात आपला अधिवास निर्माण केला आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय व्याघ्रगणना फेज १ वेळेस आलेल्या काही स्वयंसेवकांना कोयना भागात पाली व जुगंटी परिसरात ‘बाजी’ वाघाच्या डरकाळ्या ऐकण्यास मिळाल्या.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीत फेज १ मध्ये व्याघ्रगणनेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वेक्षणात केरळ, कर्नाटक, ओडिसा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतून तब्बल ७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या मोहिमेत कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘बाजी’चे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ कैद झाले आहेत. सह्याद्रीचा हा ‘बाजीराव’ आता आपल्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप असून, वनविभागाकडून त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, नुकतेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणींना सह्याद्रीत सोडण्यात आले आहे. आता ‘बाजी, सेनापती आणि सुभेदार’ या नरांच्या जोडीला मादी वाघिणी उपलब्ध झाल्याने भविष्यात सह्याद्रीत वाघांची संख्या वाढण्याची (वंशवृद्धी) मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
----
चौकट
वाघांच्या हद्दीत न जाण्याचे आवाहन
चिपळूण व पाटण तालुक्यातील जंगलामध्ये या भागातील नागरिक विविध कारणाने भटकंती करत असतात. त्यांनी वाघाच्या हद्दीत जाऊ नये तसेच वाघ दिसल्यास प्रथम वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहन आणि जनजागृती या भागातील नागरिकांना वनविभागाकडून सुरू आहे.
-----
कोट
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पर्यटन संस्था पर्यटकांना भैरवगड, पाली, कोयना परिसरातील पर्यटन स्थळांसाठी सहली आयोजित करतात. वाघांच्या वाढत्या वावरामुळे सह्याद्रीतील वन पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कोयनेच्या हद्दीत वाघांची संख्या वाढली तर चिपळूण, पाटण या भागात पर्यटन विषयावर काम करणाऱ्या संस्थांची संख्या वाढेल. याचा थेट फायदा स्थानिक युवकांना होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
- सुरेश रहाटे, शिरगाव, चिपळूण
-----
चौकट
बाजीची वैशिष्ट्ये :
वय : साधारण ३ ते ३.५ वर्षे (पूर्ण वाढ झालेला नर).
पंज्याचा ठसा : १६ सेमी x १६ सेमी इतका मोठा आणि रुंद.
सध्याची स्थिती : बाजी या परिसरात शिकार करून आपली हद्द टिकवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com