धामणवणेत रविवारी रंगणार बांधावरचे संमेलन

धामणवणेत रविवारी रंगणार बांधावरचे संमेलन

Published on

धामणवणेत रविवारी रंगणार बांधावरचे संमेलन
रंगणार साहित्याचा अनोखा सोहळा; राज्यातील पहिलाच प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास,’ असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे ‘बांधावरचे संमेलन’ येत्या रविवारी (ता. ८) चिपळूणनजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात होणार आहे. मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत होणारा हा मराठी साहित्यक्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग ठरणार आहे.
रविवारी सकाळी ९.४५ वा. शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, सातेरीमातेच्या वारूळाचे पूजन आणि गंगेने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून संमेलनाचे उद्‍घाटन होईल. या वेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळ्याला प्रारंभ होईल. या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी असून, डॉ. प्रशांत पटवर्धन, आमदार शेखर निकम, डॉ. तानाजीराव चोरगे, विनोद कुलकर्णी, उमेश सकपाळ, प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या रसिकांना चहापानासोबतच अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या ‘शाकाहारी मोंगा-पोपटीचा’ आस्वाद घेता येणार आहे. संपूर्ण संमेलन घरगुती आणि पारंपरिक वातावरणात पार पडणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) तर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर आणि संयोजन समितीचे सर्व सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
----
चौकट
असे आहेत कार्यक्रम
या संमेलनात ८ रोजी होणारे कार्यक्रम असे - कविता ः तंत्र आणि मंत्र (सकाळी १०.४५ वा.) ज्येष्ठ अभ्यासक विजय जोशी यांचे काव्यविवेचन. कथाकथन सत्र (सकाळी ११.४५ वा.) ः सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्रात संगमेश्वरी, तिलोरी, कोकणी आणि खारवी या बोलभाषांतील कथांचे सादरीकरण होईल. शेतीची गाणी (दुपारी २ वा.) ः मातीशी नातं सांगणाऱ्या लोकगीतांचे सादरीकरण. मुलाखत सत्र (दुपारी ३ वा.) ः संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांची स्नेहल जोशी व मंगेश बापट मुलाखत घेतील. कविसंमेलन (दुपारी ४ वा.) ः नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील २४ कवींचा काव्यरंग जमेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com