जिल्ह्यात सीटीईटी देणारे १,०२२ शिक्षक
सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना दिलासा
निवडणूक कामातून, १,०२२ शिक्षक वगळले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः एकीकडे सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक असताना दुसरीकडे निवडणूक आदेश प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांपुढे गंभीर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार, टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार २२ शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळून त्यांच्या जागी अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता.७ ) रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामकाजासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबत शिक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले. याच कालावधीत ७ व ८ फेब्रुवारी रोजी केंद्र शासनातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) वेळापत्रकानुसार संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले असून, जिल्ह्यातील १ हजार २२ शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षेस बसणार आहेत. १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, शिक्षकांना टीईटी/सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित शिक्षकांना सेवेतून सक्तीने निवृत्त करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही परीक्षा शिक्षकांच्या नोकरीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. राज्यभरातून आलेल्या मागणीचा विचार करून निवडणूक आयोगाकडून शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले असून, त्यांच्या जागी अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांच्या जागी अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची धावपळ सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

