

जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेचा निर्धार
बारावीची परीक्षा आजपासून; नऊ भरारी पथके तैनात
अलिबाग, ता. ९ ः उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीची परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यात एकूण ५२ केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. काॅपीमुक्त परीक्षा होण्यासाठी एकूण नऊ भरारी पथके आणि पूर्ण वेळ बैठे पथक तैनात करण्यात आले आहे.
बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे या परीक्षेला अधिक महत्त्व देण्यात येते. परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीही गठित करण्यात आली आहे. केंद्रांवर परीक्षेआधी एक तास व परीक्षेनंतर एक तास बैठक पथक असणार आहे. त्यामुळे काॅपीमुक्त परीक्षा होण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांना काॅपी न करता कोणतीही भीती मनात न बाळगता परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रांत सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. तसेच ड्रोनद्वारेही कॉपी देणाऱ्या व करणाऱ्यांवर नजर असणार आहे. यंदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
केंद्रांच्या परिसरात कडक निर्बंध
प्रत्येक परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या परिसरात मोबाईल फोन, पेजर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एसटीडी बुथ, झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक पेपरच्या २४ तास आधीपासून परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परीक्षेआधी विद्यार्थ्यांची झडती
विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर आल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांकडून झडती घेण्यात येणार आहे. मुलींच्या तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जर विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची काॅपी आढळल्यास विद्यार्थ्यांना त्या विषयाचा पेपर देण्यास मनाई करण्यात येईल.
------------
सासू-सुनेची जोडी
जिल्हा परिषदेवर
अलिबाग : जिल्हा परिषद निवडणुकीत अलिबागमध्ये घराणेशाहीला मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कुटुंबातील दोन उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत सासू-सुनेची जोडी विजयी ठरली. थळ आणि चेंढरे या दोन्ही मतदारसंघांतील निकालांनी राजकारणात मोठी चर्चा रंगली. चेंढरे गटातून आदिती नाईक-दळवी यांनी तब्बल पाच हजार ५५ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रविणा घासे यांचा पराभव केला. या मतदारसंघात ५७७ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. आदिती नाईक-दळवी यांच्या विजयामुळे शिवसेनेचे वर्चस्व या भागात अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, थळ मतदारसंघातून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी सहा हजार ४६९ मताधिक्याने विजय मिळवला.
-------
खालापुरात पंचायत
समिती महायुतीकडे
खालापूर ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत खालापुरात अजित पवार गटाला मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. पंचायत समिती महायुतीने ताब्यात घेत २०१७ ला झालेल्या पराभवाची परतफेड केली आहे. भाजपला प्रथमच सर्वाधिक तीन जागा मिळाल्या असून दोन जागा शिंदे गट आणि दोन जागा ठाकरे सेना गट आणि एक जागा अजित पवार गटाला मिळाली आहे.
---
वादातून तलवारीने
जीवघेणा हल्ला
उल्हासनगर : शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, जुन्या वादाचा राग मनात धरून तलवारीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहर हादरले आहे. रविवारी (ता .८) मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत दोन तरुण जखमी झाले असून, याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-------
घरांची शास्ती
रद्दच्या सूचना
वाशी : नवी मुंबई महापालिका हद्दीतील गाव गावठाण आणि इतर सर्व गरजेपोटीच्या घरांना लावण्यात आलेली जाचक शास्ती रद्द करण्याची सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी महापौर, उपमहापौर आणि गटनेत्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मागील पाच ते सहा वर्षांमध्ये महापालिका प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्यासाठी समिती स्थापित करण्याची सूचना देखील दिली आहे.
-----
मातब्बर नेत्यांना
मतदारांनी नाकारले
अलिबाग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षातून (शेकाप) भाजपामध्ये प्रवेश केलेल्या काही मातब्बर उमेदवारांना अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला आहे. शेकापच्या बळावर यापूर्वी एकहाती विजय मिळवणारे हे नेते पक्षांतरानंतर मतदारांची साथ टिकवण्यात अपयशी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्यातील आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाच्या चित्रा पाटील यांना ४,५१५ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती म्हणून ओळख असलेल्या चित्रा पाटील यांना स्थानिक पातळीवरील प्रभाव असूनही विजय मिळवता आला नाही. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड. निलिमा पाटील यांचाही पराभव झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.