पुरुष लावणीला प्रतिष्ठा देणारे ‘लावणीसम्राट
-rat११p३१.jpg-
P२६O२३९११
पावस ः गोळपकट्ट्यावर कुणाल पाटील यांची मुलाखत घेताना अविनाश काळे.
----
परिश्रम अन् आत्मविश्वासातून घडला ‘लावणीसम्राट’
कुणाल पाटील ः पावस येथील गोळपकट्ट्यावर उलगडला प्रवास
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १२ ः समाजाच्या रूढ चौकटी मोडत उपेक्षा आणि संघर्षावर मात करत एका सामान्य गावातून राज्यभर ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील कासारवेली येथील ‘लावणीसम्राट'' कुणाल पाटील. पुरुष लावणी या दुर्मिळ आणि कठीण कलेत त्यांनी सातत्य, शिस्त आणि संस्कृतीची जपणूक करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोळपकट्टाच्या ७६व्या कार्यक्रमात त्यांच्या जीवनप्रवासाची उकल झाली.
कला ही उपजत असते; मात्र तिला घडवण्यासाठी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटी लागते. रत्नागिरी जिल्ह्यातील कासारवेली गावचे ‘लावणीसम्राट’ कुणाल पाटील यांचा जीवनप्रवास याचे उत्तम उदाहरण आहे. गोळपकट्टाच्या ७६व्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या पाटील यांची मुलाखत अविनाश काळे यांनी घेतली. या मुलाखतीतून त्यांच्या संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी उलगडली.
आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने कुणाल यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. आईने प्रचंड कष्ट करून त्यांना वाढवले. अनेकदा उपाशी झोपावे लागले तरीही लहानपणापासून नृत्याची आवड मनात रुजत गेली. सहावीत असताना सार्वजनिक पूजेत ‘मुंगळा मुंगळा’ या गाण्यावर नऊवारी साडी नेसून केलेला नृत्यप्रयोग हा त्यांच्या कलेचा पहिला ठळक ठसा ठरला. टीव्हीवरील ‘बिनबायकांचा तमाशा’ पाहून पुरुष लावणीची प्रेरणा मिळाली. मित्राच्या ओळखीने लावणीसाठी लागणारी तयारी, वेशभूषा आणि सादरीकरण याची माहिती घेतली. बारावीमध्ये असताना विठाबाई नारायण गावकर यांची ‘पोटासाठी नाचते मी’ ही लावणी सादर केली आणि प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. सुरुवातीची सात–आठ वर्षे अत्यंत कष्टाची गेली. रात्री उशिरा स्पर्धा संपल्यानंतर बस नसल्याने दहा-बारा किलोमीटर पायी चालत घरी जावे लागे. मिळालेली बक्षिसे साठवून हळूहळू साहित्य जमवले. २००८ पासून सलग १७ वर्षे त्यांनी नृत्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
-----
चौकट
२५ कलाकारांचा ग्रुप
महाराष्ट्र शासनाचा २०१० मध्ये ‘कलाश्री पुरस्कार’ कुणाल पाटील यांना मिळाला. आज त्यांच्या घरी सुमारे ३०० सन्मानचिन्हे आहेत. आज कुणाल पाटील कृषी विभागात कायमस्वरूपी नोकरीत कार्यरत आहेत. लावणीमुळेच त्यांना ही नोकरी मिळाली, असे ते सांगतात. ‘रंग हा लावणीचा जल्लोष’ या कार्यक्रमातून गेली दहा वर्षे ते २५ कलाकारांचा कुटुंबासारखा ग्रुप सांभाळत आहेत. लावणीच्या सादरीकरणात सुसंस्कृतपणा, शिस्त आणि परंपरेचा सन्मान जपत त्यांनी पुरुष लावणीला नवी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

