नाटक

नाटक
Published on

-rat१२p१.jpg-
२६O२४०१५
ओळी ः परिवर्त बहुद्देशीय संस्था-नाशिक या संस्थेने सादर केलेल्या ‘कूच कूच’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
राजकीय वास्तवावर चाबूक ओढणारे ‘कूच कूच’
नाशिकच्या परिवर्त बहुद्देशीय संस्थेचा प्रयत्न; रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ः राजकीय पटलावर समाजाला कुरतडणारे उंदीर (मुषक), भष्ट्राचार, शासनाच्या विविध योजना यांचा समाजावर तसेच मतदार यांच्यावर होणार परिणाम याचा लेखाजोखा लेखक रोहित पगारे यांनी ‘कूच कूच’ या संहितेतून उलगडला. दिग्दर्शक नूतन गोरे-पगारे यांच्या संकल्पनेतून हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत नाशिकच्या परिवर्त बहुद्देशीय संस्थेने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर केले. राज्यातील मतदारांच्या समस्या आणि सध्याचे राजकीय वास्तवावर नेमकेपणाने बोट ठेवलेल्या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
-------
रंगमंचावर पुंगीवाला आपल्या पुंगीच्या सुरांनी उंदीर नावाच्या राज्यातील सर्व उंदीर पळवून नेतो; मात्र त्या राज्याचा मुख्य उंदीर (मुखिया) मागेच राहतो. पुंगीवाला आणि मुख्य उंदीर यांच्यात संवाद होतो. मुख्य उंदीर ठामपणे सांगतो की, ‘हे सगळे उंदीर माझे आहेत, ते पुन्हा माझ्याकडेच येतील.’ यानंतर पुंगीवाला आणि मुख्य उंदीर यांच्यात झटापट होते. संघर्षात दमलेला मुख्य उंदीर अखेर पुंगीवाल्याचा सचिव बनतो. पुढे उंदीर राज्यात निवडणूक होते आणि पुंगीवाला मंत्री बनतो. मंत्रिपदाच्या शपथविधीचा प्रसंग रंगतदाररित्या साकारला जातो. विशेष म्हणजे, नाट्यगृहातील प्रेक्षकांमधूनच उंदीर रंगमंचावर येतात आणि लोकशाहीतील जनसहभागाचा आभास निर्माण होतो. मंत्री झाल्यानंतर पुंगीवाला राजकीय पटलावरील गुप्त बैठका, सत्ताकारण आणि योजनांचा सपाटा सुरू करतो. लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना अशा अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून तो ‘मतदार राजा’ला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो; मात्र कालांतराने राज्याचा कोषागार रिकामा होतो. सचिव असलेला मुख्य उंदीर मंत्र्याला वास्तवाची जाणीव करून देतो. तो सांगतो, तुम्ही आमच्यासाठी खूप केलं, आम्हाला जेवण दिलं, काळजी घेतली; पण आता योजना थांबवायला हव्यात. कोषागारात फक्त ७ लाख ५३ हजार ७१३ रुपये ३ नवे पैसे शिल्लक आहेत. या वेळी तो प्रश्न उपस्थित करतो, ‘मतदाराला दाखवलेले चांगले दिवस नेमके कुठे आहेत?’ हे ऐकून पुंगीवाला मंत्री संतप्त होतो. तो सचिवाला सुनावतो, ‘कोषागारात पैसा उभा राहील, चिंता करू नका. जनसंपर्क वाढवा. निधी आम्ही आणू आणि एक काम करा पेट्रोलचे दर वाढवा.’ या भांडवलशाही वृत्तीला कंटाळून मुख्य उंदीर संतापाने म्हणतो, ‘लोकशाहीत भांडवलदारांचे पाय चाटणारे तुम्ही! समाजाशी तुम्हाला काही देणंघेणं नाही.’ या प्रश्नार्थक आणि प्रखर भूमिकेमुळे चिडलेला पुंगीवाला मंत्री मुख्य उंदराला ठार मारतो. ‘कूच कूच’ हे नाटक आजच्या राजकीय वास्तवाचे तीव्र आणि उपरोधिक रूपक आहे. भ्रष्टाचार, लोकांना लुभावणाऱ्या योजना, करांच्या माध्यमातून मतदारावर टाकलेला आर्थिक भार, सत्तेची लालसा आणि भांडवलदारांचे वर्चस्व हे सगळे घटक अभिनय व नेपथ्याच्या माध्यमातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहेत.
---
* सूत्रधार आणि सहाय्य
निर्मिती प्रमुख ः प्रा. गंगाधर अहिरे, नितीन भुजबळ, लेखक ः रोहित पगारे, दिग्दर्शक ः नूतन गोरे-पगारे, नेपथ्य सहाय्यक ः नीलेश गांगुर्डे, भीमराव चव्हाण, शरद केदारे, प्रकाशयोजना ः रवींद्र रहाणे, पार्श्वसंगीत ः भरत कुलकर्णी, रंगभूषा ः माणिक कानडे, वेशभूषा ः कृष्णा शिंदे.
----
* पात्र परिचय
पुंगीवाला ः रोहित पगारे, मुख्य उंदीर ः किरण मोहिते, ताई ः श्रावस्ती मोहिते. उंदीर ः काव्या बागुल, स्वरा केदारे, सृष्टी चव्हाण, रेयांश पगारे, निर्मिका चव्हाण, आरव गांगुर्डे, रेवांत पगारे, ओवी गांगुर्डे, कियांश पगारे.
-----------
* आजचे नाटक
नाटक ः खानगाणी, सादरकर्ते ः पुण्यशील सुमित्रा राजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा. वेळ सकाळी ११.३० वा. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com