''गोमॅको''ची ''ओपीडी'' बुकिंग ऑनलाईन

''गोमॅको''ची ''ओपीडी'' बुकिंग ऑनलाईन

Published on

24136

‘गोमेकॉ’ची ‘ओपीडी’ बुकिंग ऑनलाईन
सिंधुदुर्गाला दिलासा ः पहिल्या दिवशी रुग्णांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः गोवा-बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (गोमेकॉ) रुग्णांसाठी ऑनलाईन ओपीडी अपॉइंटमेंट बुकिंग सेवा सुरू केली असून, या सुविधेमुळे उपचार प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध आणि सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे, या सेवेला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत १८१ रुग्णांनी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली आहे. वेळेची बचत होणार असल्याने या सुविधेचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
सरकारी रुग्णालयातील लांबलचक रांगा, केसपेपरसाठी तासनतास करावी लागणारी प्रतीक्षा आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी होणारी गर्दी, हे चित्र आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे हळूहळू बदलणार आहे.
गोमेकॉ प्रशासनाकडून ही सेवा प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक स्वरुपात सुरू करण्यात आली असून, पुढील काळात अधिक विभागांमध्ये आणि अधिक स्लॉट्ससह या सेवेचा विस्तार केला जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
सध्या ही ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पाच प्रमुख ओपीडी विभागांमध्ये लागू करण्यात आली आहे. यात मेडीसिन (सामान्य औषधोपचार), सर्जरी, त्वचाविज्ञान, ईएनटी (कान-नाक-घसा) व अस्थिरोग यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दररोज काही निवडक विभागांसाठी १०० स्लॉट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णांचा प्रतिसाद वाढल्यास ही संख्या तसेच विभागांची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार आहे.
गोमेकॉ प्रशासनाच्या माहितीनुसार, ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेल्या रुग्णांना ७ दिवसांच्या आत त्यांच्या सोयीप्रमाणे वेळ मिळणार आहे. त्यामुळे रुग्णालयात सकाळपासून रांगेत उभे राहण्याची गरज कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाईन नोंदणी केलेल्या रुग्णांना केसपेपरसाठी वेगळी धावपळ करावी लागणार नाही. ठरलेल्या वेळेनुसार रुग्ण थेट संबंधित विभागात जाऊन उपचार घेऊ शकतील. यामुळे रुग्णांचा वेळ वाचणार असून, डॉक्टरांवरील अनावश्यक ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. या सुविधेमुळे अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर रुग्णांना त्यांच्या वेळेनुसारच रुग्णालयात हजर राहता येणार असल्याने गर्दी कमी होण्यास मदत होईल.
रुग्णांना नियोजित वेळेत उपचार मिळणे, रांगा कमी होणे, गर्दी नियंत्रणात येणे आणि वेळेची बचत होणे हे या सुविधेचे मुख्य फायदे आहेत. सिंधुदुर्गसारख्या सीमावर्ती जिल्ह्यातील ग्रामीण आणि गंभीर रुग्णांसाठी ही सुविधा मोठा दिलासा देणारी ठरणार असून, आरोग्यसेवा अधिक सुलभ व सर्वसमावेशक होण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

कोट
बांबोळी रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतीच आहे. त्यामुळे साहजीकच आरोग्य प्रशासनावर ताण येतो. रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत आणि त्यांचा प्रतीक्षा वेळ कमी व्हावा, हाच या सुविधेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्याच दिवशी रुग्णांचा मिळालेला प्रतिसाद हा उत्साहवर्धक आहे.
- डॉ. राजेश पाटील, अधीक्षक, गोमेकॉ

कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना या ऑनलाईन सुविधेचा सर्वाधिक लाभ होणार आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य रुग्ण नियमित तपासणीसाठी बांबोळी रुग्णालयात येत असतात. या सेवेमुळे त्यांच्या वेळेची बचत होईल. भविष्यात व्यापक स्वरुपात ही सेवा उपलब्ध होणार आहे.
- गजानन बणगे, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र शासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com