रत्नागिरी-दोन संस्कृती, विचारधारांचा लढा उलगडणारे ''''वसुभूमी
राज्य नाट्यस्पर्धा--लोगो
rat13p1.jpg-
24236
रत्नागिरी ः फिनिक्स क्रियेशन्स-कोल्हापूर या संस्थेने सादर केलेल्या ''वसुभूमी'' या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
दोन संस्कृती, विचारधारांचा लढा उलगडणारे ‘वसुभूमी’
फिनिक्स क्रिएशनचे सादरीकरण ; कलाकारांच्या अभिनयाला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः कोणत्याही भूमीमध्ये दोन संस्कृती, दोन विचारधारा एकत्र येतात तेव्हा संघर्ष सुरू होतो. या संघर्षामुळे अनेक संस्कृती व सत्ताधीशांचा नाश झाला आहे. वर्चस्ववादात कोण्या एकाची माघार किंवा ऱ्हास ठरलेलाच असतो. आजही काही देशांमध्ये हे चित्र दिसते. जे देश आपल्या संस्कृती व विचारांपासून भरकटतात त्यांचा ऱ्हास निश्चित होतो, असा हा ठळक संदेश ‘वसुभूमी’ या नाटकातून देण्यात आला. राज्यनाट्य स्पर्धेत फिनिक्स क्रिएशन्स कोल्हापूर या संस्थेने हा प्रयोग येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात सादर केला. प्रमोद पुजारी यांच्या लेखणीतून उतरलेले आणि संजय मोहिते यांच्या दिग्दर्शनातून नाटक अभिनयातून रंगले.
-------
काय आहे नाटक?
भरतभूमीपासून खूप दूर असलेली ‘वसुभूमी’ बेट चहुबाजूंनी सागराने वेढलेली आहे. निसर्गाला, वृक्षांना देव मानणारे लोक तेथे राहतात. अनेक वर्षे या बेटाची कोणालाही माहिती नसल्याने बेटावर कोणतेही आक्रमण झालेले नसते; मात्र बेट काबीज करण्याच्या लालसेपोटी ‘घोरी’ नावाचे सैनिक आक्रमण करण्यास सुरवात करतात. त्यामुळे वसुभूमीला बाहेरच्या विचारधारांचा स्पर्श होतो. छिद्रे शोधली जातात आणि पौरजनांना सावध राहण्याचा इशारा दिला जातो. ‘कालात्यैत’ गुरूचे शिष्य ''दास्यबाबा'' जमलेल्या पौरजनांना सांगतात की, वसुभूमीचे प्रमुख घेवारीरान व प्रधान सांझर हे उपस्थित आहेत.
दास्यबाबा प्रयोग करून ‘कुरको’ नावाच्या वनस्पतीपासून एक औषध बनवतात. हे औषध मृत्युपासून वाचवण्यासाठी उपयुक्त असते. या औषधाचा पहिला प्रयोग दास्यबाबा घेवारीरानवर करायचा ठरवतात; मात्र ''हेरा'' व ''दत्ता'' हा प्रयोग आमच्यावर करा, अशी मागणी करतात. दास्यबाबा हे नाकारतात कारण, त्यांना ते अपमानास्पद वाटते आणि हेच पुढे विनाशाचे कारण ठरते. वसुभूमीवर या अगोदर ''घोरीं''नी आक्रमण केले होते; पण वसुभूमीने युद्धकौशल्याने ते परतवून लावले होते. त्या वेळी पकडलेले सैनिक हेरा आणि दत्ता यांना दास्यबाबा व घेवारीरानच्या विरोधात भडकवले जाते. दास्यबाबांच्या शोधातील वनस्पती कोणती, हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात. दास्यबाबा वनस्पतीचे नाव सांगतात; पण तिची प्रक्रिया सांगत नाहीत. नाव कळताच हेरा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतो. “मी तुम्हाला वनस्पतीचे नाव सांगितले; पण प्रक्रिया नाही, असे सांगत दास्यबाबा प्राण त्यागतात. दास्यबाबा यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले जातात. चौकशीत हेरा व दत्ता हेच दोषी असल्याचे स्पष्ट होते. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होते; मात्र त्याआधीच घोरी सैनिक वसुभूमीविषयी गुप्त माहिती मिळवून आपल्या देशात कळवतात. त्यानुसार पुन्हा वसुभूमीवर आक्रमण होते आणि वसुभूमीचा पूर्णतः ऱ्हास होतो.
--------------------
* सूत्रधार आणि सहाय्य
लेखक ः प्रमोद पुजारी, दिग्दर्शक ः संजय मोहिते, नेपथ्य ः शिवप्रसाद पोळ, विजयंत शिंदे, प्रकाशयोजना ः रोहन घोरपडे, संगीत दिग्दर्शन ः ऋषिकेश देशमाने, रंगभूषा व वेशभुषा ः डॉ. राजश्री खटावकर, पार्श्वसंगीत ः अभिजित लावंड, साहसदृश्ये ः आदित्य कुंभार, नृत्यदिग्दर्शक ः डॉ. राजश्री खटावकर, रंगभूषा सहाय्यक ः भूपेंद्र चारी, रंगमंच व्यवस्था ः टीम फिनिक्स.
----
* पात्र परिचय
दास्यबाबा ः प्रमोद पुजारी, घेवारी रान ः रोहन सावळे, हेरा ः आदित्य कुंभार, दाता ः ओंकार माळी, सांझर ः जीवन पाटील, घोरी सैनिक ः प्रमोद फडतरे, भैरी ः वैष्णव जाधव, गृहस्थ ः अविष्कार कांबळे, मुरा ः ऋत्विक भाट, सेंबी ः आशिका चौधरी, धामा ः ज्ञानेश्वरी शिरसेकर, स्त्री ः पद्मावती राऊत, अघोरी बहिणी ः याज्ञी नानिवडेकर, सानिया शेख.
----------
* आजचे नाटक
नाटक ः राहिले दूर घर माझे. सादरकर्ते ः राजश्री विश्वकल्याण मल्टिपर्पज सोसायटी, जुळे-सोलापूर. वेळ ः सकाळी ११.३० वाजता. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

