रत्नागिरी- संस्कृत पाठशाळा येथे ऋग्वेद घनपारायण

रत्नागिरी- संस्कृत पाठशाळा येथे ऋग्वेद घनपारायण

Published on

रत्नागिरीत वेद मूर्ती मुरवणे गुरूजी यांचा सन्मान
संस्कृत पाठशाळा; २० ते २२ दरम्यान परशुराम चरित्रकथेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : झाडगाव येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत सध्या ऋग्वेद घनपारायण सुरू आहे. त्या अनुषंगाने येत्या २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत पुण्यातील प्रणव गोखले यांच्या वाणीतून परशुराम चरित्रकथेचे आयोजन केले आहे तसेच २२ ला सायं. ७ वा. वेद मूर्ती घनपाठी दत्तात्रेय महादेव मुरवणे गुरूजी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
वेद आणि शास्त्र या विषयांतील दोन विभूती वे. मू. वैदिकमार्तंड, वैदिक शिरोमणी (कै.) विनायक आठल्ये गुरूजी आणि व्याकरणाचार्य (कै.) पु. ना. फडके शास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली पाच वर्षे गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. २५ डिसेंबर २०२५ पासून कंठस्थ ऋग्वेद घनपारायण सुरवात झाली आहे.
या संदर्भात माहिती देताना संस्कृत पाठशाळेचे ओंकार पाध्ये म्हणाले, प्राचीन काळापासून भारतीय वैदिक परंपरा संवर्धन केली गेली ती गुरूकुल शिक्षणपद्धतीमुळेच. गुरूमुखातून प्राप्त झालेली ही वेदविद्या आजच्या विज्ञानयुगातही अक्षर, मात्रा, स्वर यांचा किंचितही बदल न होता जपली गेली ती मौखिक परंपरेतून. वेदाध्ययन करायचे झाल्यास प्रखर बुद्धिमत्ता, वेदनिष्ठा आणि अभ्यासाचे कष्ट करण्याची तयारी हे गुण आवश्यक आहेत. प्राचीन पद्धतीने वेदाध्ययन करताना घनपाठापर्यंतचे अध्ययन पूर्ण करण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी लागतो.


चौकट १
२२ पर्यंत घनपारायण सुरू
संस्कृत पाठशाळेमध्ये विश्वंभर वैजनाथ कानशुक्ले हे कंठस्थ ऋग्वेद घनपारायण करत आहेत आणि घनपाठी रामचंद्र भास्कर मुंडले गुरूजी (तेंडोली) हे श्रोता म्हणून उपस्थित आहेत. येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पारायण चालू राहणार आहे. इच्छुकांनी पारायण श्रवणाचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन पाठशाळेने केले आहे.

कोट
ऋग्वेद संहिता ग्रंथात साडेदहा हजारांहून अधिक ऋचा आहेत. या ऋचांमधील शब्दांचे संधी सोडवून प्रत्येक पद हे पदपाठ ग्रंथात म्हटले जाते. या पदपाठाच्या आधारेच जटा, माला, शिखा, रेखा, रथ, दंड, ध्वज, घन या अष्टविकृती म्हटल्या जातात. यापैकी शेवटची आणि सर्वात कठीण असलेली घनपाठ ही विकृती आहे.
- ओंकार पाध्ये, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com