रत्नागिरी-सुधारित हेल्पलाइनमुळे थांबले भास

रत्नागिरी-सुधारित हेल्पलाइनमुळे थांबले भास

Published on

24364

काही सुखद---लोगो

पोलिसांच्या हेल्पलाइनमुळे एकाकी वृद्धेचे थांबले भास
चाइल्डलाईनचीही मदत; जागरूक समाजसेविकेमुळे वृद्धेलाही दिलासा
शिरीष दामले : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिल्हा पोलिस प्रशासनाने पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनने तातडीने मदत केल्यामुळे एका वृद्ध महिलेचा मानसिक आजार वाढण्यापासून ती वाचली. या प्रकरणात चाईल्डलाईनचीही चांगली मदत झाली.
शहरातील एकटी राहणाऱ्या लक्ष्मीबाई या वृद्धेचा समाजसेविका श्रद्धा कळंबटे यांना फोन आला. त्या आजींनी कळंबटे यांना सांगितले की, त्यांच्या शेजारील घरात लहान मुलांना मारहाण होत असून ती मुले ओरडत आहेत. मुलांच्या ओरडण्याचा आवाज त्या आजींना येत होता. फोन आल्यावर कळंबटे यांनी चाईल्डलाईनशी संपर्क साधला. चाईल्डलाईनच्या सदस्यांनी संबंधित घरात आणि आजूबाजूला चौकशी केली; मात्र मारहाणीचा प्रकार घडत असल्याचे त्यांना आढळले नाही. चाईल्डलाईनने दुसऱ्या दिवशी सकाळीही तेथे जाऊन माहिती घेतली; मात्र काही आढळून आले नाही. पाठोपाठ दोन दिवस आजींचा फोन आल्याने कळंबटे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी पोलिसांकडून सुरू केलेल्या वृद्धांसाठीच्या हेल्पलाइनकडे संपर्क केला. आजींनी सांगितलेली ती हकीगत सांगून तिथे जाऊन आजींना भेटण्याची विनंती केली. हेल्पलाइनतर्फे काही स्वयंसेवक आजींच्याकडे गेले त्या वेळी त्यांना आजीकडून माहिती मिळाली की, आजींना मानसोपचारतज्ञाची औषधे सुरू आहेत. ती त्यांनी बंद केली होती. त्यामुळे त्यांना भास होत होते. हे कळल्यावर आजींना मानसोपचारतज्ञांकडे नेण्यास स्वयंसेवकांनी त्यांच्या मुलांना सांगितले. औषधे सुरू झाल्यावर आजींचे भास बंद झाले. चाईल्डलाईन आणि वृद्धांसाठीच्या हेल्पलाइन याचा अशा तऱ्हेने उपयोग झाला. समाजात एकाकी वृद्धांची संख्या वाढते आहे अशावेळी ही यंत्रणा उपयोगी पडू शकते, याचा चांगला अनुभव आला.

कोट
पोलिसांवर अनेकवेळा टीका होते; मात्र ही यंत्रणा समाजासाठी गुन्हेगारीचा शोध या पलीकडे जाऊन काम करू शकते, हे या प्रसंगाने कळून आले आहे. चाईल्डलाईन लोकांना माहीत झाली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाचे या हेल्पलाइनबाबत कौतुक करावे लागेल. या हेल्पलाइनची मदत घेण्याचे नागरिकांनी ध्यानी ठेवावे.
- श्रद्धा कळंबटे, समाजसेविका, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com