आडवलीत १९ ला 
शिवजन्मोत्सव सोहळा

आडवलीत १९ ला शिवजन्मोत्सव सोहळा

Published on

आडवलीत १९ ला
शिवजन्मोत्सव सोहळा
मसुरे ः सनराईज शिवजन्मोत्सव मंडळ, आडवली व शिवप्रेमींच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ चे भव्य आयोजन १९ फेब्रुवारीला होळीचा माळ, श्री देव रवळनाथ मंदिर, आडवली येथे सकाळी ९ वाजता आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता पालखी मिरवणूक (आडवली तिठा ते श्री देव रवळनाथ मंदिर) मुख्य आकर्षण श्री देव गायगोठण ढोलपथक, भूतवाडी (नारिग्रे), १० वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक सादरीकरण, १०.३० वाजता शिवजन्मोत्सव सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांवर सप्तनद्यांचा जलाभिषेक, विधीवत पूजा, पाळणा गीते, महाआरती, ११.३० वाजता पुरातन वस्तू, शिवकालीन नाणी व शस्त्रांचे प्रदर्शन उद्घाटन, दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ, सायंकाळी ७ वाजता महाराजांच्या चरणी ३९६ दीपोत्सव, रात्री ८ वाजता महाआरती, ९ वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा विषय शिवकालीन, संतकालीन, पेशवेकालीन व्यक्तिरेखा व प्रसंग सादरीकरण हा आहे. नोंदणीची अंतिम तारीख १५ ला आहे. प्रथम २० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाणार आहे. नावनोंदणीसाठी यांच्याशी संपर्क साधावा.
------
ओटवणे-गावठणवाडी येथे
२० पासून क्रिकेट स्पर्धा
सावंतवाडी ः ओटवणे-गावठणवाडी येथील बबलू गावकर मित्रमंडळातर्फे २०, २१ व २२ फेब्रुवारीला खुल्या ओव्हरआर्म ध्रुव चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ओटवणे ग्रामपंचायतीनजीकच्या मैदानावर काँक्रिटच्या खेळपट्टीवरील या तीन दिवसीय स्पर्धेत गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार क्रिकेट शौकिनांना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक मालवणीसह हिंदी व मराठीत समालोचन करणार आहेत. निवडक १६ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. क्रिकेटचा कुंभमेळा टेनिस क्रिकेट यू ट्युबवर लाईव्ह पाहता येणार आहे. प्रथम पारितोषिक १,५०,००२ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय ७५,००२ रुपये व ध्रुव चषक, तृतीय ३०,००२ रुपये तर चतुर्थ १५,००२ रुपयांचे पारितोषिक आहे. मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज आदी वैयक्तिक पारितोषिके व चषक आहेत. संघानी आकाश मेस्त्री, उदित गावकर, विशाल गावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिन गावकर यांनी केले आहे.
.......................
सावंतवाडी भाजपतर्फे
समर्पण दिन उत्साहात
सावंतवाडी ः पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृतिप्रित्यर्थ सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम युवानेते विशाल परब यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहसंयोजक केतन आजगावकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची महती विषद केली व कार्याचे स्मरण केले. यावेळी विशाल परब, केतन आजगावकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, आजगाव शक्तीकेंद्र प्रमुख ओंकार प्रभू गिरीश परब, बंड्या दळवी, भाजप राज्य सोशल मीडिया प्रमुख अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.
.......................
वेंगुर्लेत २७ पासून
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः शहरातील भुजनागवाडी जुन्या पंचायती समिती कार्यालयानजीकच्या वेंगुर्लेकर तेली ‘समाजाच्या १२५ वर्षांच्या पुरातन देवालयातील श्री देव कुळेश्वर या देवतेचा वार्षिक उत्सव २७ व २८ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांनी होत आहे. यानिमित्त सकाळी ८ ते दुपारी १ वाजता देवाची पूजा व लघुरुद्र, रात्री ९ ते १० वाजता भजन, २८ फेब्रुवारीला सकाळी ८ ते दुपारी १ वाजता होम, रात्री ९ ते १० वाजता भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
......................
विजयनगर साम्राज्याच्या
राजांचे म्हापण येथे शिल्प
कुडाळ ः विजयनगर साम्राज्याचे राजे हरिहर व बुक्क यांनी १३४५ ते १३५२ या काळात म्हापण येथील सिद्धेश्वर (महादेव) मंदिर बांधले होते. त्या राजांची शिल्पे शंकर गोविंद ठाकुर उर्फ प्रकाश ठाकुर यांनी मंदिराच्या बाजूला जतन केली आहेत. त्या ‘खोरणा’चे उद्‍घाटन अ‍ॅड. रणजीत देसाई यांच्या हस्ते १५ ला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. म्हापण येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ हा सोहळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com