श्री देव गणेश्वर देवस्थान मोर्डे येथील शतकोत्तर महाशिवरात्री उत्सव

श्री देव गणेश्वर देवस्थान मोर्डे येथील शतकोत्तर महाशिवरात्री उत्सव

Published on

-rat१४p५.jpg-
P२६O२४४९०
साखरपा : मोर्डे येथील श्री देव गणेश्वर मंदिर
-rat१४p६.jpg-
P२६O२४४९१
मंदिरातील शंकर पार्वती यांच्या मूर्ती
-rat१४p७.jpg-
P२६O२४४९२
जुने मंदिर असलेले महादेव देवस्थान
---------

महाशिवरात्र विशेष--लोगो

कळस नसलेले, पण श्रद्धेने भरलेले मंदिर
मोर्डेतील गणेश्वर देवस्थान; काशीहून कोकणात आली मूर्ती, आज शतकोत्तर महाशिवरात्री उत्सव
अमित पंडित : सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १४ ः कोकणात अनेक गावातील महाशिवरात्री उत्सव प्रसिद्ध आहेत; पण त्यातही स्वत:चे वेगळेपण टिकवून शतकोत्तर वाटचाल केलेला शिवरात्री उत्सव म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे गावचा श्री देव गणेश्वर देवस्थानचा शिवरात्री उत्सव. या मंदिरातील श्री शंकराची मूर्ती काशीहून पाठीवरून आणल्याचे सांगितले जाते.
या देवळाच्या स्थापनेबाबत आख्यायिका सांगितली जाते. मोर्डे गावाचे ग्रामस्थ (कै.) गणेश आप्पा सरदेसाई यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी गणेश्वराची संगमरवरी मूर्ती पाठीवर घेऊन पायी चालत काशीहून गावात आणली. मूर्तीसोबत भवानी पार्वतीचीही संगमरवरी मूर्ती होती. मूर्ती गणेश यांनी आणली आणि त्यांच्या नावावरून गणेश्वर असे नामकरण करण्यात आले. दोन्ही मूर्तींची स्थापना गावातील एका शेताजवळ छोटे मंदिर बांधून केली. या स्थानाला आजही महादेव असे संबोधले जाते. कालांतराने हे मंदिर जीर्ण होऊन मोडकळीस आले. दरम्यान, गणेश सरदेसाई यांचे वंशज (कै.) नरहर सरदेसाई यांना एक दिवशी स्वप्नात दृष्टान्त (१८७० ते १८८५) झाला. स्वप्नात ब्रह्मवृंद येऊन त्याने नवीन देऊळ बांधावे, असे सांगितले त्याचप्रमाणे त्यांना स्वप्नात शंकराचा सर्प दिसला. हा सर्प जुन्या मंदिरापासून निघून गावातील एका दुसऱ्या जागेपर्यंत गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नरहर सरदेसाई यांना खरोखरच मंदिराच्या जुन्या जागेपासून उमटलेली सर्पाची पोटगळ (सर्प सरपटत गेल्याची जमिनीवरील खूण) दिसली. ही पोटगळ ज्या जागी जाऊन थांबली होती त्या जागी गणेश्वराचे नवीन मंदिर बांधण्यात आले. आजमितीस हे मंदिर त्याच जागी उभे आहे. नवीन मंदिर बांधण्यात आल्यावर शिवरात्री उत्सव सुरू करण्यात आला.
१९६३ ला गणेश्वर देवस्थानाचा ट्रस्टची स्थापना झाली आणि १९९० ला हा ट्रस्ट नोंदणीकृत झाला. दरम्यान, मंदिरातील पार्वतीची मूर्ती काही कारणाने भग्न झाली. नरहर सरदेसाई यांचे पुत्र (कै.) वामन नरहर सरदेसाई यांनी स्वखर्चाने जयपूरहून नवीन मूर्ती तयार करून घेतली. सध्या हीच मूर्ती मंदिरात विराजमान आहे. १९७८-७९ ला विश्वनाथ सप्रे यांनी देवळाचा जीर्णोद्धार केला. सप्रे हेही मोर्डे गावाचे ग्रामस्थ. त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठी खोट बसली. त्या वेळी त्यांनी व्यवसायवृद्धीसाठी गणेश्वराला नवस केला. अल्पावधीतच त्यांचा व्यवसाय भरभराटीस लागला आणि त्यांनी नवसपूर्ती म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे बांधकाम पारंपरिक रचनेतील नाही. मंदिर म्हटले की, मंदिरावर कळस असतोच; पण गणेश्वर मंदिराला कळस नाही. या मंदिराची इमारत कोकणातील घरांसारखी कौलारू आहे.
-------
चौकट
दशमी ते अमावस्या पाच प्रदक्षिणा
गणेश्वर मंदिराचा शिवरात्री उत्सव तालुक्यात प्रसिद्ध आहे. गेली चाळीस वर्षे ही जबाबदारी संजय वसंत सरदेसाई पार पाडत आहेत. उत्सवकाळात दशमी ते अमावास्या या दिवशी पालखीच्या पाच प्रदक्षिणा देवळाला घालण्याची परंपरा आहे. शिवरात्रीच्या दिवशी पालखीच्या दहा प्रदक्षिणा घातल्या जातात.
------
चौकट
मंदिरात पिंडीऐवजी महादेवाची मूर्ती
गणेश्वर हे शंकराचे रूप. कोकणात शंकराची अनेक मंदिरे आढळतात; पण बहुतांश मंदिरात शंकर पिंडी असते. गणेश्वराचे मंदिर मात्र त्याला अपवाद आहे. या मंदिरात शंकर (अर्थात गणेश्वर) आणि पार्वतीच्या मूर्ती आढळतात. पिंडी असलेल्या मंदिरात पिंडीभोवती अर्धप्रदक्षिणा घातली जाते; पण मोर्डे इथल्या गणेश्वराच्या मंदिरात मूर्ती असल्यामुळे इथे पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com